हुपरीचा शहरी विभागात समावेश करण्यास मान्यता
By admin | Published: January 15, 2016 11:33 PM2016-01-15T23:33:20+5:302016-01-16T00:52:57+5:30
नगरपरिषदेसाठी मार्ग मोकळा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतील निर्णय
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपरिषद स्थापन करण्यासाठी, तसेच या औद्योगिक नगरीचा ग्रामीण विभागात असणारा समावेश रद्द करून शहरी विभागामध्ये करण्यास जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसा ठरावही करण्यात आला.
आता फक्त जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांकडून ‘ना हरकत संमती पत्र’ घेतल्यानंतर रौप्यनगरीची नगरपरिषद स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबतचा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेण्यासाठी समाजकल्याण सभापती किरण कांबळे, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांचे प्रयत्न कामी आले.
रौप्यनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी याठिकाणी नगरपरिषदेची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी येथील पत्रकारांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग असणाऱ्या कृती समितीची स्थापना करत जनतेच्या पाठबळाच्या जोरावर लढा उभारला होता. विविध आंदोलने उभारून राज्य शासनाने सातत्याने पाठपुरावा करून नगरपरिषद स्थापन्यास मंजुरी मिळविली होती. येथे नगरपरिषदेची उभारणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मान्यता, मंजुरीविहित नमुन्यातील प्रशासनाचे ठराव यादींची पूर्तता करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. शासनाने काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करून स्थायी समितीमध्ये याप्रश्नी करण्यात आलेला ठराव, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे ना हरकत संमती पत्र घेऊन विहित नमुन्यातील सविस्तर माहिती मागितली होती.
दरम्यानच्या काळामध्ये विधान परिषद निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू असल्यामुळे स्थायी समितीची बैठक लांबणीवर पडली होती. परिणामी, शासनाने मागविलेली माहिती पाठविण्यास थोडा विलंब लागला. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीचे
आयोजन केले होते. यावेळी समाजकल्याण सभापती किरण कांबळे व जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी प्रयत्न करून बैठकीमध्ये ठरावास मान्यता मिळविली.
यापुढील कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे ना हरकत संमती पत्र घेऊन शासनाकडे पाठवून देणे इतकेच काम राहिले जाते. त्यानंतर शासन पातळीवरील सर्व मंजुरी व मान्यतांची पूर्तता होताच रौप्यनगरीवासीयांचे गेल्या २५ वर्षांपासूनचे असणारे नगरपरिषद स्थापन्याबाबतचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. (वार्ताहर)
पदांना मुकावे लागणार
नगरपरिषदेची स्थापना जर येत्या काही दिवसांमध्ये झाल्यास समाजकल्याण सभापती किरण कांबळे, पंचायत समिती सदस्य रावसाहेब पाटील, सुप्रिया सलमर व सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार यांच्यासह अन्य १५ ग्रामपंचायत सदस्यांना आपआपल्या पदांना मुकावे लागणार आहे.
परिणामी, रौप्यनगरीवासीयांतून ‘खुशी’, तर पदाधिकाऱ्यांमध्ये ‘गम’चे वातावरण अनुभवण्यास मिळत आहे.