कोल्हापूर-शिर्डी रेल्वेला तत्त्वत: मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:14 AM2017-08-03T01:14:53+5:302017-08-03T01:14:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : धार्मिक स्थळ जोडणी योजनेअंतर्गत कोल्हापूरहून शिर्डीला रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली होती.
कोल्हापूरहून सुटणाºया रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा याबाबत एकीकडे खासदार महाडिक यांनी पाठपुरावा सुरू केला असून देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून खासदार महाडिक यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) अशी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.
कोल्हापूर ते नागपूर एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा निघते आणि कोल्हापुरात पोहोचल्यानंतर मेंटेनन्सनंतर ही गाडी तब्बल ३२ तास मिरज स्टेशनच्या रॅकमध्ये उभी असते. या कालावधीमध्ये या रेल्वेचा वापर करून कोल्हापूर-शिर्डी सेवा सुरू करता येईल, असे महाडिक यांनी प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले. बुधवारी सायंकाळी चार वाजता ही गाडी कोल्हापुरातून निघाल्यास गुरुवारी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी शिर्डीला पोहोचेल. तसेच गुरुवारी सकाळी शिर्डीतून निघून गुरुवारी रात्री उशिरा १२ ते १२.३० दरम्यान कोल्हापुरात पोहोचेल. यानंतर नियमित नागपूरच्या फेरीसाठी ही गाडी पुन्हा सज्ज राहू शकते. रेल्वेमंत्री प्रभू यांनी रेल्वे ट्रॅक व ट्रॅफिकची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यास सहमती दर्शवून, नव्या गाडीला तत्त्वत: मंजुरी दिली. रेल्वेचे एडीजीएम पी. डी. गुहा यांनी ही नवीन रेल्वे सुरू करण्यात तांत्रिक अडचण नसल्याचे सांगितले.
सध्या मिरज-पंढरपूर धावणारी रेल्वे कोल्हापूरपासून सुटावी, आठवड्यातून दोनदा कोल्हापूर-अहमदाबाद रेल्वे सुरू करावी, अशीही मागणी महाडिक यांनी केली. यावेळी कोल्हापूर विभागीय रेल्वे मंडळाचे सदस्य समीर शेठ उपस्थित होते. कोल्हापूर, मिरज, कुर्डूवाडी, दौंड ते शिर्डी किंवा कोल्हापूर, मिरज, पुणे, दौंड ते शिर्डी या दोन मार्गांपैकी एका मार्गावरून ही रेल्वे सुरू होईल.