राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात पदव्यूत्तर शिक्षणाला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:44+5:302021-07-16T04:17:44+5:30
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वेैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्यूत्तर शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान ...
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वेैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्यूत्तर शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. २०२१-२२ या येत्या शैक्षणिक वर्षापासून या दोन्ही अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. ओैषधशास्त्र आणि सूक्ष्म जीवशास्त्र या दोन विषयांसाठी प्रत्येकी तीन जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.
या महाविद्यालयात १४ विषयांचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम शिकवण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रस्ताव प्रशासनाने आयोगाकडे सादर केला होता. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली होती. यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तज्ज्ञ पथकाने या वर्षीच्या सुरुवातीला येथील सहा विषयांच्या मूलभूत सोयी आणि सुविधांविषयी पाहणी केली होती.
या पाहणीनंतर त्यांनी सादर केलेल्या शिफारशींना अनुसरून औषधशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या दोन विषयांच्या पदव्यूत्तर अध्यापनास परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापुरातच पदव्यूत्तर शिक्षण उपलब्ध झाल्याने याचा फायदा समाजातील सर्वसामान्य घरातील हुशार विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
चौकट
आता प्रतीक्षा अन्य विषयांची
आयोगाच्या पथकाने पदव्यूत्तर शल्यचिकित्साशास्त्र, कान, नाक घसा, जीवरसायनशास्त्र, भूलशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, आणि सूक्ष्मजीवशास्त्र या सहा विषयांच्या संदर्भात पाहणी केली होती. यातील दोनच विषयांना परवानगी मिळाली आहे. अजूनही चार विषयांच्या परवानगीसाठी प्रतीक्षा आहे. तर आठ अभ्यासक्रमांसाठी अजूनही तपासणी व्हायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.