कोल्हापूर महापालिका स्वतंत्र घटक म्हणून मान्यता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:06+5:302021-07-02T04:18:06+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या बाबतीतील अहवाल राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे योग्य पध्दतीने जाईल, याची खबरदारी घेतली गेल्यामुळे सोमवारपासून शहरातील ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या बाबतीतील अहवाल राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे योग्य पध्दतीने जाईल, याची खबरदारी घेतली गेल्यामुळे सोमवारपासून शहरातील सरसकट सर्वच दुकाने तसेच व्यवसाय सुरु होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापालिका स्वतंत्र घटक करण्यास महापालिकेने मान्यता दिली असून, तसा अहवाल महापालिकेने जिल्हा आपत्ती कक्षाला व त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रधान सचिवांना गुरुवारी पाठवला आहे. त्यामुळे स्वतंत्र घटक म्हणून राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून मंजुरी मिळाल्यावर सरसकट दुकाने सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सोमवारीही जर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला तर निर्बंध मोडून दुकाने सुरु करण्याचा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी गुरुवारी दिला.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या स्थिर असली तरी चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे बाधितांची टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील निर्बंध उठवावेत, अशी मागणी व्यापारी, दुकानदार यांनी लावून धरली आहे. बुधवारी या संदर्भात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांच्याकडे गुरुवारी सायंकाळपर्यंत कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीचा अहवाल गेला आहे.
हा अहवाल योग्य पध्दतीने तयार केला जावा, यासाठी आमदार चंद्रकांत जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, धनंजय दुग्गे, प्रशांत शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या कार्यालयात बसून होते. जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालातील एक, दोन त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या. कोल्हापूर शहराला स्वंतत्र युनिट तयार करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा ना हरकत महापालिकेकडून मागवून घेण्यात आले. तसे पत्र देताना शहरातील पॉझिटिव्हिटीचा रेट हा ९.९ असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. त्यानंतर राज्याच्या आपत्ती व्यवस्थान विभागाने आपला अहवाल सायंकाळी राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवला.
निर्णय आज अपेक्षित
आज (शुक्रवारी) राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच अन्य अधिकारी यांची चर्चा होऊन निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ कोल्हापूरला परतले. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने दुकाने बंदच राहणार आहेत, त्यामुळे आता शहरातील सर्वच दुकाने, व्यवसाय सोमवारी सुरु होण्याची शक्यता आहे.
सरकार योग्य निर्णय घेईल : शेटे
जर जिल्हा प्रशासनाने शहरातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर मात्र व्यापारी गप्प बसणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत दुकाने, व्यवसाय सुरु करतील, असा इशारा चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिला आहे. व्यापारी आता गप्प बसण्याच्या मानसिकतेत नाहीत, त्यामुळे राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
४ जून २०२१ला कोल्हापूर जिल्हा हा पूर्ण घटक धरून घोषित
त्यानुसार जिल्ह्याचा स्तर-४ मध्ये समावेश
कोल्हापूर शहराचा २४ ते ३० जून २०२१चा आरटीपीसीआर नुसार पॉझिटिव्हिटी दर : ९.०९
कोल्हापूर शहरातील एकंदरीत दर : ८.९ टक्के
महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन बेडचा वापर : ४५५ पैकी २८५ (६२.६३ टक्के)
खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन बेडचा वापर : १४२५ पैकी १०२५ (७१.९२ टक्के)
कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट जिल्ह्यापेक्षा कमी असूनही एकच घटक असल्याने शहरातील दुकाने आहेत बंद