व्हेंटिलेटर पुरवठा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:01+5:302021-05-14T04:23:01+5:30
कोल्हापूर : पी. एम. केअर फंडातून कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेल्या ६१ पैकी २६ व्हेंटिलेटर बंद पडले. हा पुरवठा करणाऱ्या बेंगलोर ...
कोल्हापूर : पी. एम. केअर फंडातून कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेल्या ६१ पैकी २६ व्हेंटिलेटर बंद पडले. हा पुरवठा करणाऱ्या बेंगलोर येथील भारत इलेक्ट्राॅनिक्स कंपनीकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे.
गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी कोल्हापूर जिल्ह्याला पी. एम. केअर फंडामधून ६१ व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात आला. मात्र, काही दिवसांतच २६ व्हेंटिलेटर बंद पडले. यंदा दुसऱ्या लाटेवेळी जेव्हा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआर रुग्णालयात बैठक घेतली, तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे समोर आले.
हे नादुरुस्त व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला. दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ पाठविण्याची विनंती करण्यात आली. परंतु कशालाही या कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. अखेर पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार वॉरंटी पिरियड असतानाही स्थानिक पातळीवर बायाे मेडिकल इंजिनिअर नेमून त्यांच्याकडून १० व्हेंटिलटर दुरुस्त करून घेण्यात आले आहेत.
चौकट
चायना मेड मटेरियल
या व्हेंटिलेटरसाठी संपूर्ण साहित्य हे चीनमधील वापरण्यात आले आहे. त्यामुळे दुरुस्ती करताना सर्किट, सेन्सर यासारखे सुटे भागच कोठे मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीवरही मर्यादा येत आहेत.
चौकट
कंपनीबाबतच शंका
व्हेंटिलेटरचा पुरवठा करणारी कंपनी खरोखरच आता अस्तित्वात आहे की नाही अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे. जर या कंपनीने पुरवठा केल्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिसादच मिळत नसेल, तर ही कंपनी आता सुरू आहे की बंद आहे अशी शंका घेतली जात आहे. म्हणून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.