प्रोत्साहनाच्या योजनांची शिफारस हाळवणकर समितीने करावी
By admin | Published: November 18, 2014 12:47 AM2014-11-18T00:47:22+5:302014-11-18T01:00:57+5:30
वस्त्रोद्योग प्रश्न : प्रकाश आवाडे यांची शिफारस; आज कोल्हापुरात बैठक होणार
इचलकरंजी : राज्यात शेती खालोखाल रोजगार देणारा वस्त्रोद्योग व्यवसाय आहे. म्हणून सूतनिर्मिती ते कापड उत्पादन आणि गारमेंट-नेटिंगला प्रोत्साहन मिळेल, असा शिफारस करणारा अहवाल आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने शासनाकडे द्यावा. किंबहुना राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने यंत्रमाग क्षेत्रासह वस्त्रोद्योगामध्ये आधुनिक तंत्र आणून निर्यातीत दर्जाच्या कपड्याची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना जाहीर करण्याचे प्रयत्न या समितीने करावेत, अशी अपेक्षा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.
राज्यातील वस्त्रोद्योगामधील सर्व घटकांचा अभ्यास करून वस्त्रोद्योग विषयक धोरण ठरविण्यासाठी शिफारस करण्याच्या उद्देशाने आमदार हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शासनाने नेमली आहे. या समितीची बैठक उद्या, मंगळवारी कोल्हापूर येथे आयोजित केली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार बैठकीत माजी मंत्री आवाडे बोलत होते. केंद्र सरकारच्या टफस् योजनेप्रमाणे साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण करणारी, बॅँकांच्या कर्जावर सात टक्के व्याजाची सवलत देणारी, एक रुपये ८० पैसे दराने वीज उपलब्ध करणारी, नवउद्योजकांना ३५ टक्के पॅकेजिंग इन्सेंटिव्ह देणारी, आदी शिफारशींचा समावेश या अहवालात असावा. तसेच कापडावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करणारा टेक्स्टाईल प्रोसेसिंग पार्क इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव येथेही उभा करण्यात यावा. इचलकरंजीचे रूपांतर टेक्स्टाईल हबमध्ये व्हावे, अशा प्रकारच्या शिफारशी समितीच्या अहवालात असाव्यात, असेही आवाडे म्हणाले.
राज्याचे वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, तर वस्त्रोद्योगाविषयी शिफारशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार हाळवणकर आहेत. या दोघांचाही वस्त्रोद्योगामध्ये अभ्यास असल्याने वस्त्रोद्योगाच्या प्रोत्साहनाबरोबरच कामगार कल्याण मंडळाची स्थापना, कामगारांची घरकुले, विमा, कामगार प्रशिक्षण अशा शिफारशी या अहवालामध्ये केल्या जाव्यात, अशी अपेक्षा आवाडे यांनी व्यक्त केली. यावेळी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, अशोक आरगे, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हाळवणकरांची कालची भूमिका आज आवाडेंकडे
यापूर्वी केंद्र व राज्यात कॉँग्रेसचे सरकार होते. तेव्हा आपण विरोधी पक्षाचा आमदार असल्याने आमदार फंडातील विकासकामांव्यतिरिक्त अन्य कामे करण्यासाठी मला मर्यादा पडतात, अशी भूमिका आमदार हाळवणकर घेत असत. नेमकी तशीच भूमिका आता माजी मंत्री आवाडे यांनी पत्रकार बैठकीत घोषित केली आणि वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी त्यांना आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.