शिरोळमध्ये विक्रमी १८५ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:37+5:302021-07-07T04:29:37+5:30
शिरोळ : लोकमत वृत्तपत्र समूह व वाघजाई युवा मंच शिरोळ तालुका, माजी आमदार उल्हासदादा पाटील यूथ फाउंडेशन यासह विविध ...
शिरोळ : लोकमत वृत्तपत्र समूह व वाघजाई युवा मंच शिरोळ तालुका, माजी आमदार उल्हासदादा पाटील यूथ फाउंडेशन यासह विविध मंडळांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शिरोळ येथील शिवाजी तख्त येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल १८५ रक्तदात्यांनी या वेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या ‘लोकमत’च्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला शिरोळ विभागातही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यंदा कोरोनामुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शिरोळमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, लोकमतचे वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, इव्हेंट विभागाचे दीपक मन्नाडकर, पृथ्वीराज यादव, सचिन शिंदे, नगरसेवक तातोबा पाटील, श्रीवर्धन माने-देशमुख, डॉ. अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, इम्रान अत्तार, प्रकाश गावडे, सतीश अथणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळात रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिरोळकरांनीही रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत १८५ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. या शिबिरास मिरज सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, शतायू मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, शिरोळ यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रावसाहेब माने, बाळ बाबर, नेताजी संकपाळ, अमृत हेरवाडे, मयूर जाधव, योगेश देशमुख, मोहन पाटील, विजय केंपवाडे, उमेश माने, रविकांत जगदाळे, अर्जुन जाधव यांच्यासह विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
फोटो - ०५०७२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - शिरोळ येथे सोमवारी महारक्तदान शिबिर पार पडले. या वेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, लोकमतचे वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, बाळ बाबर, पृथ्वीराज यादव, रावसाहेब माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.