परीक्षा देऊनही निकालपत्रात अनुपस्थितीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:55 PM2020-12-11T13:55:58+5:302020-12-11T13:59:00+5:30
Shivaji University, Result Day, Student, Education Sector, kolhapur विविध विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली असताना काही विद्यार्थ्यांच्या निकालपत्रात अनुपस्थित अशा स्वरूपाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर : विविध विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली असताना काही विद्यार्थ्यांच्या निकालपत्रात अनुपस्थित अशा स्वरूपाची नोंद झाली आहे.
निकालातील त्रुटी दूर करण्याबाबत शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि महाविद्यालयांकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. परीक्षा मंडळाने अंतिम सत्र आणि वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने घेतल्या.
या परीक्षांचे निकालही गेल्या महिन्यात ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आले आहेत. त्यांतील काही विद्यार्थ्यांच्या निकालपत्रांमध्ये (गुणपत्रिका) अनुपस्थित, तर शून्य गुण मिळाल्याची नोंद झाली आहे.
निकालपत्रातील या त्रुटी लवकर दूर कराव्यात, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांमध्ये केली आहे. मात्र, महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांना विद्यापीठातील परीक्षा मंडळात जाण्यास सांगितले जात आहे.
परीक्षा मंडळात स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. विद्यापीठाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
गुणपत्रिका लवकर मिळाव्यात
बी. एस्सी., बी. कॉम., एम. कॉम., बीबीए., एम. ए., आदी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील काही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी येत आहे.
या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने तातडीने गुणपत्रिका द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर अभिजित राऊत, विजय करजगार, मंदार पाटील, राजू जाधव, आदींच्या स्वाक्षरी आहेत.