अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा विक्रम
By admin | Published: October 24, 2015 01:15 AM2015-10-24T01:15:06+5:302015-10-24T01:18:28+5:30
नवरात्रौत्सव : भाविकांनी गाठला २१ लाखांचा आकडा; असुविधांचाही त्रास
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांच्या संख्येने मंदिराच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच २१ लाखांचा टप्पा पार केला आहे. भक्तांच्या संख्येचा हा विक्रमी आकडा असला तरी त्यांना सामना करावा लागलेल्या गैरसोयींनीही असाच विक्रम गाठला आहे, असे म्हणावे लागेल.
गेल्या काही वर्षांत अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. नवरात्रात ही आकडेवारी १५ लाखांच्या आसपास जाते. दोन वर्षांपूर्वी हा आकडा १६ लाखांपर्यंत गेला होता. यंदा मात्र त्यात तब्बल पाच लाख भाविकांची भर पडली असून नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजे १३ ते २२ आॅक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत देवस्थान समितीने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल २१ लाख ६ हजार ६५३ इतक्या भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. अंबाबाईची सर्वदूर पसरलेली ख्याती, कोल्हापूरसह कल्याण-डोंबिवली येथील महापालिकेच्या निवडणुका, पुण्यासह, सांगलीतून मोठ्या संख्येने आलेले भाविक या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून ही उच्चांकी गर्दी झाली. मात्र दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तितक्याच गैरसोयींचा सामना करावा लागला. पार्किंगची व्यवस्था, रस्त्यांचे नियोजन, स्वयंसेवी संस्थांंच्या तातडीच्या आरोग्य सुविधा आणि भाविकांना पाण्याची सोय या सुविधा वगळता बाकी सगळ्या नियोजनाचा बोजवारा उडाला होता.
पूजांतून छुपा अजेंडा...
नवरात्रौत्सवात शक्तिरूपी दुर्गेची विविध रूपे अंबाबाईच्या माध्यमातून साकारली जातात. यंदा मात्र श्रीपूजकांनी अंबाबाईची केवळ कमळातीलच बैठी पूजा बांधून जणू अंबाबाईच्या ‘लक्ष्मीकरणा’चा चंग बांधल्याचे जाणवले. आता ठरवून कमळातील बैठी पूजा बांधल्याने भक्तांमध्ये मात्र पुजाऱ्यांबद्दल अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याशिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. ‘आता महापालिकेवरही कमळ फुलवा,’ असा प्रचारच या पूजांतून केला गेल्याचा आरोप होत आहे.
आडमार्गांनी दर्शन
निवडणुकांमुळे कोल्हापुरातील राजकीय व्हीआयपी नसले तरी स्वयंघोषित व्हीआयपींमुळे भाविकांना अंबाबाईच्या दर्शनासाठी तब्बल पाच तासांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. शनिमंदिर, सटवाई मंदिर येथून भाविकांना सोडण्यात पोलीस आणि खासगी सुरक्षारक्षक आघाडीवर होते. त्यामुळे परराज्यांतून, शहरांतून आलेल्या भाविकांवर अन्याय झाला.