सवलतीमुळे विक्रमी २१ कोटींचा घरफाळा जमा, अंतिम दिवशी २ कोटी २२ लाख जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:45 AM2020-07-01T10:45:06+5:302020-07-01T10:47:04+5:30
सहा टक्के सवलत योजनेमुळे विक्रमी २१ कोटी ३ लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. योजनेच्या मंगळवारी अंतिम दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत नागरी सुविधा केंद्रासमोर घरफाळा जमा करण्यासाठी मिळकतधारकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल २ कोटी २२ लाख घरफाळा जमा झाले.
कोल्हापूर : सहा टक्के सवलत योजनेमुळे विक्रमी २१ कोटी ३ लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. योजनेच्या मंगळवारी अंतिम दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत नागरी सुविधा केंद्रासमोर घरफाळा जमा करण्यासाठी मिळकतधारकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल २ कोटी २२ लाख घरफाळा जमा झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा टक्के सवलत योजनेचा लाभ मिळकतधारकांनी घ्यावा यासाठी घरफाळयाची बिले महानगरपालिका संकेतस्थळावर ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. याजनेचा अंतिम दिवस असल्याने मंगळवारी नागरी सुविधा केंद्राची कामकाज वेळही वाढवली होती. येथे १ कोटी ९३ लाख तर ऑनलाईनद्वारे २९ लाख २२ हजार रुपये घरफाळा जमा झाला.
घरफाळा बीलात सहा टक्के सवलत योजनाला चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षाची तुलनेत दुप्पट घरफाळा वसुल झाला आहे. या योजनेची ३० जून ही अंतीम तारीख होती. आज, बुधवारपासून ४ टक्के सवलत योजनेला सुरवात झाली आहे. ज्यांना सहा टक्के सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- संजय भोसले,
कर संग्राहक व निर्धारक
४५ हजार ९३२ मिळकतधारकांना लाभ
महापालिकेच्या तिजोरीत सवलत योजनेमुळे २१ कोटींची कमाई झाली. तर ४५ हजार ९३२ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामध्ये नागरी सुविधा केंद्रात ३४ हजार ६५ तर ऑनलाईनद्वारे ११ हजार ८६७ इतक्या मिळकतधारकांनी कर भरला.