‘गोकुळ’साठी विक्रमी मतदान

By Admin | Published: April 24, 2015 01:43 AM2015-04-24T01:43:07+5:302015-04-24T01:43:07+5:30

आज मतमोजणी : ९९.६९ टक्के ठरावधारकांनी बजावला मताधिकार

Record poll for 'Gokul' | ‘गोकुळ’साठी विक्रमी मतदान

‘गोकुळ’साठी विक्रमी मतदान

googlenewsNext

 कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी व खासगी दूध उद्योगाचे लक्ष लागून राहिलेल्या येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अत्यंत ईर्ष्येने तब्बल ९९.६९ टक्के मतदान झाले. गोकुळच्या इतिहासात प्रथमच इतके उच्चांकी मतदान झाले.
एकूण ३२४९ पैकी ३२३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केवळ दहा मतदारांचे मतदान झाले नाही. सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात ही सरळ लढत होत आहे. मतमोजणी आज, शुक्रवारी सकाळी होत असून, दुपारी बारापर्यंत ‘गोकुळ’वर आणखी पाच वर्षे ‘राज्य’ कोणाचे याचा फैसला होणार
आहे.
संघाच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात होते. येथील ताराबाई पार्कातील सेंट झेव्हिअर हायस्कूलमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरू झाले. त्यासाठी दहा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीने मतदारांना पंधरा दिवस सहलीवर नेले होते. येथे आणण्यापूर्वी सौंदत्तीच्या डोंगरावर नेऊन त्यांच्याकडून आपल्याच पॅनेलला मतदान करणार असल्याच्या शपथा घेतल्यानंतरच त्यांना मतदानासाठी आणण्यात आले. सत्तारूढ पॅनेलमधून विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह सहा माजी अध्यक्ष, तेवढेच संचालक आणि सहा नवे चेहरे रिंगणात आहेत. सत्तारूढ आघाडीस राष्ट्रवादी काँग्रेसने उघड, तर भाजपने छुपा पाठिंबा दिला आहे. विरोधी आघाडी करण्यात सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला असला, तरी त्यांच्यासोबत खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिवसेना नेते संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार विनय कोरे, दिनकरराव जाधव, संपतराव पवार यांनीही ताकद लावली आहे. विरोधी पॅनेलमधून चार आजी-माजी संचालक नव्याने नशीब आजमावत आहेत. त्यामुळेच ही काटाजोड लढत होत आहे. सत्तारूढ आघाडीने मतदारांना सहलीवर नेले होते. त्यांनी ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान केल्यास ‘गोकुळ’ची सत्ता पुन्हा महाडिक व पी. एन. पाटील यांच्याकडेच राहील, असे मतदानानंतरचे चित्र होते.
सकाळी दोन्ही आघाडीचे नेते मतदान केंद्रांवर हात जोडून आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करत होते. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक हे मतदान केंद्रात कार आणण्याचा प्रयत्न करताना महाडिक विरुद्ध सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांत जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. ही घटना वगळता मतदान शांततेत झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक पाटील हे काम पाहत आहेत.
समरजितसिंह घाटगेंचे मतदान..
दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांचे चिरंजीव समरजितसिंह यांनी आपल्या गटातील मतदारांसोबत केंद्रावर येऊन मतदान केले. त्यावेळी सत्तारूढ आघाडीतील उमेदवार रणजितसिंह पाटील यांनी त्यांची भेट घेतली.
ठरावधारकांची चंगळ संपली..
चुरशीमुळे यावेळी ठरावधारक मतदारांना सुगीचे दिवस आले होते. भावही चांगलाच उधारला होता. अनेक मतदारांना सहलीवर पाठवून तीर्थक्षेत्र दर्शन घडविले. अलिशान हॉटेलमध्ये जेवण दिले. मतदान झाल्यामुळे ठरावधारकांची चंगळ संपली आहे.
मतदान इकडे आणि...
‘नमस्कार तिकडे आणि मतदान इकडे’ अशी मिश्किल कोटी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी करताच उपस्थितामध्ये प्रचंड हशा पिकला.
दोन जावयांना सांभाळावे लागते..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील समर्थक मतदारांना घेऊन केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील यांनी नमस्कार करून आवाहन केल्या. त्यावर पाटील यांनी आम्हाला कागल आणि भुदरगड या दोन तालुक्यांतील जावयांना सांभाळावे लागते, असा टोला लगावला.
मतदान रेंगाळले..
निवडणूक रिंगणात ५४ उमदेवार होते. परिणामी मतपत्रिका मोठी होती. त्यामुळे मतदारांना नाव आणि चिन्ह शोधून मतदान करताना विलंब लागत होता. सहलीवरून एकावेळी आणलेले मतदार आणि मतपत्रिकेत शोधून करायला लागणारे मतदान यामुळे प्रक्रिया रेंगाळली. दुपारी साडेबारा ते दोन पर्यंत केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
तहसीलदारांशी वाद...
मतदान केंद्राच्या ठिकाणी उमेदवार चंद्रकांत बोंद्रे मतदारांना आवाहन करत थांबले होते. थकल्यामुळे ते खुर्चीवर जावून बसले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व गगनबावड्याचे तहसीलदार विकास भालेराव यांनी आक्षेप घेतला. खुर्ची काढण्यास बोंद्रे यांनी नकार दिला. यातून त्यांच्यात वाद झाला. शेवटी अशोक पाटील येऊन हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला.
‘हा घ्या निकाल...!’
‘गोकुळ’साठी अत्यंत चुरशीने मतदान झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक आणि एकच प्रश्न होता तो म्हणजे निकालाचे काय..? सत्तारूढ आघाडीने सुमारे बाराशे ठरावधारक मतदारांना सहलीवर नेले होते. त्यांना पिवळ््या टोप्या घालून एकगठ्ठ्याने मतदानासाठी आणले. नेत्यांना नमस्कार करत हे सर्वजण मतदान केंद्रात गेले. त्या टोपीशी व केलेल्या नमस्काराशी प्रामाणिक राहून त्यांनी जर ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान केले असल्यास सत्तारूढ आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांचेच पॅनेल विजयी होणार हे स्पष्टच आहे. सत्तारूढ आघाडीतील कुरघोडीच्या राजकारण, ‘क्रॉस व्होटिंग’ झाले असल्यास तर मात्र सतेज पाटील यांचे काही संचालक निवडून येतील.आता त्यांचा एकच संचालक आहे, त्यामुळे दोन जागा जरी निवडून आल्या तरी त्यांची लढाई यशस्वी झाली, असे म्हणता येईल.
दृष्टिक्षेपात ‘गोकुळ’ची ताकद
संघाची स्थापना १६ मार्च १९६३. दिवंगत नेते एन. टी. सरनाईक व आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापक. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील एकूण दुधापैकी वीस टक्के दुधाचा पुरवठा गोकुळ करतो. प्रतिदिन संकलन नऊ लाख लिटर. त्यातील मुंबईत सहा लाख लिटर वितरण. म्हैस दुधात राज्यात ‘गोकुळ’ला स्पर्धक नाही. वार्षिक उलाढाल १६०० कोटी. प्रतिदिन दूध उत्पादकाला सव्वा तीन कोटींचे वाटप. कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे स्थान. त्यामुळेच आमदारकी नको, परंतु मला ‘गोकुळ’चा संचालक करा, अशी राजकीय कार्यकर्त्यांची इच्छा असते. (प्रतिनिधी)

Web Title: Record poll for 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.