कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस अन् नुकसान, पाच वर्षांतील सर्वाधिक नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:23 PM2024-10-02T12:23:03+5:302024-10-02T12:23:24+5:30
पडझडीची संख्याही वाढली : २०२१ च्या तुलनेत नुकसानीचा आकडाही मोठा
कोल्हापूर : ऑक्टोबर महिना उजाडला तरी यंदा पाऊस सुरूच आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी १४८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस यावर्षी कोसळला आहे. एक सारखा पाऊस राहिल्याने खासगी व सार्वजनिक मालमत्तांच्या पडझडीतही वाढ झाली असून २०२१ च्या तुलनेत नुकसानीचा आकडाही दोन कोटींनी वाढला आहे.
यावर्षी मान्सून जून महिन्यात अगदी वेळेत हजर झाला. त्यामुळे खरीप पेरण्या वेळेवर झाल्या. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी २४९ मिलीमीटर पाऊस झाला. जुलै महिन्यात धुवांधार पाऊस कोसळला. महिन्याभरात पावसाने अक्षरशा झोडपून काढले. विशेष म्हणजे या महिन्यात सलग २४ दिवस पाऊस राहिल्याने सरासरी ७७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
ऑगस्टमध्येही पाऊस राहिला, अधून मधून का असेना; पण सरासरी ३१८ मिली पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात तुलनेत कमी पाऊस राहिला; पण वार्षिक सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस राहणार असल्याने वार्षिक सरासरी ओलांडली जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत २०२१ ला महापुराने मोठे नुकसान केले; पण २०२१ ला सलग पाऊस राहिला नाही, आठ-दहा दिवसांतच एकदम पाऊस झाल्याने महापुराने शेतीसह नागरिकांचे कंबरडे मोडले होते; पण या कालावधीत सरासरी १४७७ मिलीमीटर पाऊस झाला होता.
गेल्या चार महिन्यांत असा राहिला पाऊस, मिलीमीटरमध्ये
जून : २५०
जुलै : ७७१
ऑगस्ट : ३१८
सप्टेंबर : १४४
पाच वर्षांत असा राहिला पाऊस, मिलीमीटरमध्ये
वर्ष | सरासरी पाऊस | पडझडीची संख्या | झालेले नुकसान |
२०२० | १४०५ | ७६७ | २.५१ कोटी |
२०२१ | १४७७ | २५२८ | ११.७० कोटी |
२०२२ | १३४२ | ९४६ | ३.३१ कोटी |
२०२३ | ९८७ | ५०२ | १.५९ कोटी |
२०२४ | १४८३ | ४१८९ | १४.२० कोटी |