तुळशी नदीच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:10+5:302021-07-24T04:16:10+5:30
श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क : राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. येथील ...
श्रीकांत ऱ्हायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
: राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. येथील तुळशी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी राज्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. २४ तासात या पाणलोट क्षेत्रात ८९५ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. राज्यातील बहुदा हा सर्वाधिक पाऊस असल्याचे सांगितले जाते.
महाबळेश्वर येथे ६६० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता. तो राज्यातील आज अखेरचा सर्वाधिक पाऊस होता.
धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी नदीच्या चांगले पाणलोट क्षेत्रामध्ये २४ तासात नोंदवल्या गेलेल्या ८९५ मिलिमीटर पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. या पावसाने माळवाडी, पिलावरेवाडी, गोतेवाडी, कुपलेवाडी, शिरगाव या ठिकाणी दरड कोसळून, भूस्खलन होऊन नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा झाली आहे. या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले, ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. नदीकाठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने धुवून नेली आहे. नदीकाठावरचे विद्युत पंप विहिरी गायब झाल्या आहेत.
माळवाडी-केळोशी दरम्यानच्या रस्त्यावर भूस्खलन होऊन डोंगरांचा बहुतांशी भाग रस्त्यावर आल्याने रस्ताच गायब झाला आहे. येथील नंदकुमार नाईक या तरुणाची अर्धा एकर शेती ऊस व भात पिकासह पाण्याने धुवून नेली आहे. या अगोदर सन २०१९ रोजी या परिसरात ३३५ मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला होता; पण गुरुवारी बारा तासात ४०० मिलिमीटर तर गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी ६ पर्यंतच्या बारा तासात ४९५ मिलिमीटर असा एकूण ८९५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे.
तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या विक्रमी पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीची छायाचित्रे
२३ तुलशी रेन ०१,०२,०३
(सर्व छायाचित्र - श्रीकांत ऱ्हायकर )
१) केळोशी बुद्रुक ज्योतिबा वसाहत दरम्यान तुटलेला पूल
२ ) परिसरातील शेती पिकांचे झालेले नुकसान
टिप= मा . संपादक साहेबांच्या फोन सूचनेनुसार ही बातमी वेगवेगळ्या गावात जाऊन फोटो घेऊन पाठवली आहे.