सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:59+5:302021-09-02T04:50:59+5:30

कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील टाकळी या गावातील घरची एक तरी व्यक्ती सैन्यात असल्यामुळे या गावाला सैनिकांचे गाव म्हणून ओळखले ...

Record of Subhedar family at Sainik Takli in Maharashtra Book of Records | सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Next

कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील टाकळी या गावातील घरची एक तरी व्यक्ती सैन्यात असल्यामुळे या गावाला सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. सन -१९६८ साली देशभक्त डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या सहकार्याने भारताचे लष्करप्रमुख जनरल पी.पी.कुमार मंगलम, जनरल एस.पी.थोरात, ले.जनरल मोती सागर टाकळी गावात आले होते. त्यावेळी गावच्या आजी - माजी सैनिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. फौजी गणवेश परिधान करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिलेले जवान पाहताना लष्करप्रमुख भारावून गेले. टाकळी गावची महती त्यांनी स्वतः जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी '' इस गाव का नाम सिर्फ टाकळी नही, सैनिक टाकळी होना चाहिए '' असे गौरोद्गार काढले. तेव्हापासून गावाला सैनिक टाकळी म्हणून ओळखले जाऊ लागले.

आर्मी,नेव्ही,एअरफोर्स आणि पोलीस दलाच्या माध्यमातून येथील लोक आजही देशसेवा करतात. या गावचा जवान नाही, असा एकही लष्करी तळ देशात नाही, असे अभिमानाने सांगितले जाते. अगदी ब्रिटिश काळापासून येथील तरुणांनी लष्कराची वाट धरली. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने राजे, महाराजे, नबाब, जमीनदार यांना आपल्या इलाक्यातून जवान पाठवण्याचा हुकूम काढला. त्यावेळी सैन्यात भरती होणाऱ्या व लढाईवर जाणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जमिनी इनाम दिल्या गेल्या. कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा, मलखांब, लेझीम अशा इतर मैदानी खेळात तरबेज असणारे जवान भरती झाले.

सैनिक टाकळी येथील रावसाहेब मालोजीराव जाधव हे पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते. ते टाकळी गावातील पहिले सुभेदार होते तत्पश्चात या कुटुंबाला '' सुभेदार '' या टोपन नावाने ओळखले जाऊ लागले. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा मुलगा ज्ञानदेव रावसाहेब जाधव यांनी सहभाग घेतला होता. ते सुभेदार मेजर पदावर कार्यरत होते. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावित होऊन इंग्रजांच्या नोकरीचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. याचाही मुलगा ऑ.कॅप्टन बापूराव जाधव यांनी सन- १९६५ व सन-१९७१ च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला. निवृत्तीनंतर त्यांनी गावातील आजी - माजी सैनिकांना एकत्र करून '' माजी सैनिक कल्याण मंडळ '' ची स्थापना केली. आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या युद्धात शहीद झालेल्या टाकळी गावच्या १८ जवानांचे स्मारक उभे केले. गावातील वीर माता, वीर पत्नी व आजी -माजी सैनिकांच्या समस्या शासनासमोर मांडल्या. यांचा मुलगा भरतकुमार बापूराव जाधव बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये नाईक पदावर होते. त्यांनी सन-१९८४ पासून २००१ पर्यंत देशसेवा केली. सध्या सुभेदार कुटुंबामधील पाचव्या पिढीतील अक्षय भरतकुमार जाधव हाही सन-२०१६ पासून शिपाई या पदावर भरती झाला आहे.

सन-१९१४ पासून २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे हे महाराष्ट्रातील उल्लेखनीय कुटुंब ठरले आहे. त्याबद्दल सुभेदार कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून नाईक भरतकुमार बापूराव जाधव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डसचे चिफ एडीटर डॉ. सुनील पाटील यांनी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी उपसरपंच सुदर्शन भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद पाटील, गाव कामगार पोलीस पाटील सुनिता पाटील, लेखक मनोहर भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पाटील यांनी केले होते.

.

Web Title: Record of Subhedar family at Sainik Takli in Maharashtra Book of Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.