कोल्हापूरचा ऊस गाळप विक्रमाकडे
By admin | Published: March 14, 2016 12:28 AM2016-03-14T00:28:09+5:302016-03-14T00:29:46+5:30
दुष्काळातही १.९५ कोटींचा टप्पा ओलांडला : महिन्याभरात आणखी ३५ लाख टन गाळप
राजाराम लोंढे -- कोल्हापूर --कोल्हापूरला कधी नव्हे तो दुष्काळाचा चटका बसल्याने यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार, असाच कयास होता; पण सगळ्यांचे अंदाज फोल ठरवीत कोल्हापूर विभागाची विक्रमी गाळपाकडे वाटचाल सुरू आहे.
विभागाने आतापर्यंत १ कोटी ९५ लाख टनांचे गाळप केले असून, शिल्लक ऊस पाहता कारखान्यांची धुराडी अजून महिनाभर पेटतच राहणार असल्याने यंदा हा विभाग २ कोटी ३५ लाख टनांचा टप्पा पार करणार, हे नक्की! हे गाळप आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च राहणार आहे.
अलीकडील दहा वर्षांत कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात उसाचे प्रमाण वाढल्याने कोल्हापूरमध्ये सरासरी १ कोटी ३० लाख, तर सांगलीमध्ये ६५ ते ७५ लाख टन ऊस गाळप राहिले आहे; पण यंदा उसाची वाढ सुरू असतानाच पावसाने हुलकावणी दिली आणि त्यानंतर पाण्याची ओढ बसल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार, असा साखर कारखान्यांसह सरकारी यंत्रणेचा अंदाज होता; पण हेक्टरी उत्पादन घटण्यापेक्षा वाढल्याने सगळ्यांचाच अंदाज फोल ठरला. कर्नाटकातील पहिली उचल कमी असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे गेला नसल्याचा परिणामही यात दिसत आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी १ कोटी ३५ लाख ४२ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७७ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप केले होते. यंदा ९ मार्चपर्यंत कोल्हापुरात १ कोटी २५ लाख ५२ हजार, तर सांगलीमध्ये ७० लाख ३८ हजार टनांचे गाळप झाले आहे. विभागातील ३७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शिल्लक ऊस पाहता अपवाद वगळता बहुतांश कारखाने महिनाभर चालतील, असा अंदाज आहे. विभागात दररोज दीड ते पावणेदोन लाख टन उसाचे गाळप होत असल्याने तीस दिवसांत ४० ते ४५ लाख टन अजून गाळप होणार आहे. त्यामुळे काही केले तरी यंदा २ कोटी ३५ लाख टन गाळप होणार, हे निश्चित. गाळपाचा इतिहास पाहिला तर हा उच्चांक होणार आहे. .
गाळप वाढले तरी उतारा स्थिर!
उसाचे उत्पादन वाढल्याने उताऱ्यात घसरण होईल, असा अंदाज होता; पण आता विभागाचा सरासरी साखर उतारा १२.२७ टक्के आहे. गतवर्षी सरासरी १२.५८ टक्के होता. हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शिल्लक उसाला चांगला उतारा असतो. त्यामुळे उतारा वाढला नसला तरी तो गतवर्षीपर्यंत स्थिर राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.