शियेत विरोधानंतर वसुली बंद
By admin | Published: June 17, 2014 01:16 AM2014-06-17T01:16:46+5:302014-06-17T01:50:10+5:30
स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला, तर बाहेरील वाहनधारकांनी टोल दिला
कसबा बावडा : कसबा बावडा एमआयडीसी रस्त्यावरील शिये टोलनाका आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस बंदोबस्तात सुरू झाला. टोल देण्यात स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला, तर बाहेरील वाहनधारकांनी टोल दिला. दरम्यान रात्री उशीर बावड्यातील नगरसेवक व काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यानी एकत्र येऊन टोलला विरोध करून तो बंद पाडला.
गेले काही दिवस आज ना उद्या टोल सुरू होणार, अशी चर्चा होत होती. मात्र, टोल सुरू करण्याचे धाडस आयआरबीचे होत नव्हते. आजही दिवसभर कर्मचारी नाक्यावर आदेशाची वाट पाहत होते. सायंकाळी पावणेपाच वाजता कर्मचारी नेमून दिलेल्या केबिनमध्ये जाऊन टोलवसुली करू लागले. टोलवसुली करताना लोखंडी बॅरिकेटस् आडवी लावली जात होती.
काही स्थानिक नागरिकांनी टोलनाक्यावर हुज्जत घातली. त्यांना तसेच सोडून देण्यात येत होते. बाहेरील गाड्या मात्र अडविल्या जात होत्या. टोलची पावती संगणकावरची नव्हती. शिक्के मारलेल्या पावती बुकातील पावत्या दिल्या जात होत्या. सायंकाळी एमआयडीसीमधील कार्यालय सुटल्यानंतर टोलनाक्यावर गर्दी झाली, तसे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस सतर्क झाले. टोलनाक्याच्या जवळच राज्य राखीव दलाची गाडी उभी असल्याने वाहनधारकांनीही नंतर फारसा प्रतिकार केला नाही. (प्रतिनिधी)