थेट पाईपलाईनच्या बोगस बिलाची वसुली
By admin | Published: July 7, 2017 01:08 AM2017-07-07T01:08:12+5:302017-07-07T01:08:12+5:30
ठिकपुर्ली येथील पुलाचे काम : ठेकेदार ‘जीकेसी’ कंपनीकडून १ कोटी २९ लाख रुपये जमा; आयुक्तांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे बांधलेल्या पुलाच्या कामाचे जादा घेतलेले बिल महानगरपालिका प्रशासनाने योजनेचे ठेकेदार ‘जीकेसी’ कंपनीकडून अखेर वसूल केले. वसूल केलेली ही रक्कम १ कोटी २९ लाख ३३ हजार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वसुलीच्या कारवाईचे आदेश दिले होते.
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ४८९ कोटींची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना राबविली जात आहे. योजनेतील कामांची चुकीची तसेच बोगस अंदाजपत्रके तयार केल्याचा आरोप भाजप-ताराराणी आघाडीचे गटनेते विजय सूर्यवंशी व सत्यजित कदम यांनी केला होता. ठिकपुर्ली येथे जलवाहिनी टाकण्यासाठी उभारलेल्या लोखंडी पुलाचा खर्च २ कोटी ४८ लाख रुपये दाखवून त्यापैकी साठ टक्के रक्कम म्हणजे १ कोटी ५० लाख रुपये बिलही ठेकेदारास देण्यात आले. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते. याप्रकरणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी जोरदार आवाज उठवत आंदोलनही केले होते. त्यामुळे या कामाच्या चौकशीचे आदेश आयुक्त चौधरी यांनी दिले होते.
योजनेचे सल्लागार युनिटी कन्सल्टंट तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी व शाखा अभियंता हेमंत गोंगाणे यांनी चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यामध्ये ठेकेदारास चुकीच्या पद्धतीने जादा बिल देण्यात आल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्ष कामास २५ लाख रुपये खर्च आला असताना त्याचे बिल मात्र अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे २ कोटी ४८ लाख रुपयांपैकी साठ टक्के रक्कम १ कोटी ५० लाख रुपये ठेकेदारास अदा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. आयुक्त चौधरी यांनी जादा रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते.
जीकेसी कंपनीने केलेल्या कामाचे २ कोटी ९६ लाख रुपयांचे अकरावे बिल १५ जून रोजी प्रशासनास सादर केले होते. ते देण्यापूर्वी ठिकपुर्ली पुलाच्या कामात जादा घेतलेली रक्कम १ कोटी २९ लाख ३३ हजार रुपये वसूल करून मगच उर्वरित बिल ठेकेदारास अदा करण्यात आले. या कारवाईमुळे हिशेब चुकता झाला असला तरी ज्यांनी हे बिल अदा केले, त्यांच्यावरील कारवाईचा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे.
पाच पुलांच्या कामाबाबत खबरदारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेवर ठिकठिकाणी सहा पूल उभारण्यात येणार आहेत. त्यांतील एका पुलाच्या बाबतीत फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर आता अन्य पाच पुलांच्या कामाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्त चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुलांची कामे पूर्ण झाल्यावर त्याच्या खर्चाची तपासणी करून मगच त्याचे बिल अदा करावे, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे.
अंदाजपत्रकात चार पूल प्रत्येकी २.४८ कोटी रुपयांचे, एक पूल २.७६ कोटींचा, तर अन्य एक पूल ६.५० कोटींचा दाखविण्यात आलेला आहे. पहिल्या पुलाच्या कामाचा पर्दाफाश केल्यामुळे आता पुढील कामात खबरदारी घ्यावी, अशी सक्त ताकीद आयुक्तांनी दिली आहे.