कोल्हापूरात पुन्हा पावसाची रिपरिप,वाहतूक कोंडीसह पाणी साचण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 04:54 PM2019-07-11T16:54:34+5:302019-07-11T16:56:30+5:30
मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत पाणी साचून राहणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा विविध प्रकारांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी या ठिकाणी पाणी साचून राहण्याचा प्रकार झाला; तर शहराच्या काही परिसरांत वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांसह पादचारीही त्रस्त झाले.
कोल्हापूर : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत पाणी साचून राहणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा विविध प्रकारांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी या ठिकाणी पाणी साचून राहण्याचा प्रकार झाला; तर शहराच्या काही परिसरांत वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांसह पादचारीही त्रस्त झाले.
मध्यरात्रीपासून पावसाने शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या सखल भागांत दुपारपर्यंत पाणीच पाणी झाले होते. दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार झाल्याने पाणी साचून राहिले होते. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले.
दुपारनंतर काही प्रमाणात पावसाची उघडझाप सुरू होती. शहराच्या अनेक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे काम करीत होते, तर ड्रेनेज विभागाचे कर्मचारी ड्रेनेजची झाकणे काढून साफसफाईचे काम करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकाचा रस्ता भुसभुसीत झाल्याने या चौकातून वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे महावीर कॉलेजकडून आलेल्या वाहनधारकांना जिल्हा परिषदेच्या अलीकडील चौकातून आपले वाहन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर आणावे लागत होते.
त्यामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी आणि वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिवसभर होते.
यासोबत विशेषत: स्टेशन रोड, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी चौक, बिनखांबी गणेश मंदिर, टेंबे रोडवरील साईमंदिर चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, गोखले कॉलेज चौक, शिवाजी टेक्निकल परिसर, माळकर तिकटी, पापाची तिकटी, आदी परिसरांत वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. त्याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीत झाल्याचे चित्र होते. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंट येथून नदीचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरवासीयांनी दिवसभर गर्दी केली होती.