वसुली, मूल्यमापन, हिशेब... येथे सारंच चालतं आलबेल
By admin | Published: April 16, 2015 12:22 AM2015-04-16T00:22:14+5:302015-04-16T00:23:08+5:30
नागरिकांच्या नशिबी हेलपाटे : कर्मचाऱ्यांची अवघ्या दोन तासांची सेवा; घरफाळा कार्यालय म्हणजे ‘आओ- जाओ घर तुम्हारा’
संतोष पाटील - कोल्हापूर-शहरातील घरफाळा विभागाची ए, बी, सी, डी वॉर्डसाठी एक व ई वॉर्डशी एक अशी दोन कार्र्यालयांत विभागणी आहे. येथील मूल्यमापन लिपिकासह इतर बहुतांश कर्मचारी सकाळी नऊ ते दहा व त्यानंतर दुपारी चार ते सहा या वेळेत कार्यालयात भेटतात. इतरवेळी ते काय करतात, कुठे जातात, दिवसभर नेमके किती मिळकती व घरफाळ्याची वसुली तसेच मूल्यमापन कशाचे व किती केले, याचा हिशेब होत नाही.
‘आओ-जाओ, घर तुम्हारा’ अशीच येथील कार्यालयाची गत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुणात्मक व संख्यात्मक किती काम केले याचा आढावा घेतल्यास येथील यंत्रणेवर आपोआपच चाप बसणार आहे. ई-आॅफिस प्रणालीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीकडेही आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
घरफाळ्याबाबत एखादी तक्रार किंवा शंका असल्यास त्याचे निवारण त्या विभागातील मूल्यमापन लिपिकच करू शकतो. वरिष्ठ हात वर करून मोकळे होतात, संबंधित लिपिकांपर्यंत पोहोचण्यास किमान सहा ते सात फेऱ्या नागरिकांना माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
बिलातील फरक किंवा तक्रारींबाबत संबंधित लिपिकाकडे बोट दाखवून वरिष्ठ नामानिराळे होतात, तर नागरी सुविधा केंद्राची चूक, संगणकीय यंत्रणेत असलेला दोष अशी जुजबी कारणे देत कर्मचाऱ्यांकडून हात वर करण्याचे प्रकार येथे सुरू आहेत. आयुक्तांनी पकडलेला १० लाख रुपयांच्या दंडात दिलेली सूट हा प्रकारही ‘संगणकीय चूक’ म्हणत वरिष्ठ अगदी किरकोळ समजत आहेत. प्रत्यक्षात ही चूक नसून ‘सायबर क्राईम’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा प्रकारच्या चुकांसाठीही यापूर्वी परस्पर फौजदारी करण्याचे प्रकार घडले आहेत. ‘सापडला तो चोर; त्यात तो आपला असेल तर बाळ्या; दुसऱ्याचा असेल तर भामटा’ अशा पद्धतीने तक्रारीकडे पाहण्याचा घरफाळा विभागात पायंडा आहे. हाच पायंडा मोडण्याचे आव्हान आयुक्तांसमोर आहे. (समाप्त)
मात्र, चार वर्षांपूर्वी शहरातील एका मोठ्या औद्योगिक समूहाला लाखो रुपयांचा घरफाळा न भरताच त्याची बाकी शून्य दाखविण्याची किमया येथील महाभागांनी केली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशीनंतर याचे पाळेमुळे थेट आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, काही महिन्यांनंतर सर्व काही आलबेल झाले. घरफाळ्याची झाडाझडती करण्याचे काम आयुक्तांना हाती घ्यावे लागणार आहे.
कच्च्या पावतीद्वारे भरलेला घरफाळा प्रत्यक्षात मनपाच्या तिजोरीत गेला किंवा नाही याची माहिती पुढील वर्षीच्या घरफाळ्याची पावती आल्यानंतर समजते. यामध्ये काही गफलत केल्यास याची माहिती फक्त मनपातील संबंधित यंत्रणा व मालकांनाच समजते. या प्रक्रियेत नसलेल्या त्रयस्थाला यातील घोळ सहजासहजी समजत नाही. हीच घरफाळा विभागातील खरी मेख आहे. अशाप्रकारे कच्च्या पावत्या देऊन केलेला आणखी एक घोटाळा मिटविण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, याच्या खोलापर्यंत जाण्याचे धाडस वरिष्ठांनी दाखविलेले नाही. येथील घोटाळ्याचे चक्रव्यूह आयुक्त पी. शिवशंकर भेदणार की मागील अनेक प्रकरणांप्रमाणे खमंग चर्चेअंती विषय बासनात गुंडाळून पडणार हाच खरा औत्सुक्याचा विषय आहे.