माजी संचालकांकडून १५ दिवसांत वसुली
By admin | Published: January 28, 2015 12:46 AM2015-01-28T00:46:56+5:302015-01-28T00:59:32+5:30
जिल्हा बॅँक नियमबाह्य कर्जप्रकरण : विभागीय सहनिबंधकांच्या नोटिसा; कारवाईस स्थगिती नको म्हणून कॅव्हेट दाखल करणार
कोल्हापूर : नियमबाह्य कर्जपुरवठा केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांवर ‘कलम ८८’नुसार केलेल्या कारवाईला स्थगिती घेता येऊ नये, म्हणून शासनाच्यावतीने न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे माजी संचालकांसमोरील अडचणीत वाढ झाली असून, पंधरा दिवसांत पैसे भरण्याच्या नोटिसा विभागीय सहनिबंधकांनी संबंधितांना आज, मंगळवारी पाठविल्या आहेत.
बॅँकेच्या ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर जबाबदारी निश्चिती करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील माजी संचालकांसह सहकारक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आज विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी संबंधित माजी संचालकांना नोटिसा लागू केल्या. पंधरा दिवसांत जबाबदारी निश्चितीचे पैसे भरण्याचे आदेश माजी संचालकांना नोटिसीद्वारे दिले आहेत.
दरम्यान, गेले दोन दिवस माजी संचालकांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत होती. आज, सायंकाळी पाच वाजता बॅँकेचे दोन माजी संचालक विभागीय सहनिबंधक कार्यालयात आले. त्यांनी कारवाईबाबतची मुद्देनिहाय माहिती घेतली. त्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
माजी संचालकांनी जबाबदारी निश्चिती कारवाई स्थगिती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तत्पूर्वी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने उच्च न्यायालय व शासनाकडे कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे कारवाई स्थगिती मिळण्याची आशाही अंधुक झाली आहे.
संचालकपद नको रे बाबा!
जिल्हा बँकेच्या संचालकांवरील कारवाई व जबाबदारीचा आकडा पाहून सर्वसामान्य माणसांचे डोळेच पांढरे झाले आहेत. त्यामुळे स्थानिक विकास व दूध संस्थांचे संचालकपद नको रे बाबा, असे कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. त्यामुळे सध्या संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांना उमेदवार दाबून उभे करावे लागत आहेत.
पैसे भरा अन्यथा जप्ती अटळ
नोटिसीप्रमाणे माजी संचालकांनी पैसे भरले नाही तर सहकार कलम ९८(अ) नुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्यांदा जंगम मालमत्ता व नंतर स्थावर मालमत्तेची जप्ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
संचालकांच्या मालमत्ता जप्त करणार : सहकारमंत्री
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या माध्यमातून नियमबाह्य कर्जपुरवठा केल्यामुळे बॅँकेस झालेल्या नुकसानीची भरपाई बॅँकेच्या संबंधित संचालकांकडून वसूल केली जाईल. यापासून सरकार मागे हटणार नाही. नुकसान भरपाईची निश्चित केलेली रक्कम भरावी म्हणून सर्व संचालकांना नोटीस बजावण्यात येत असून, पंधरा दिवसांत जे पैसे भरणार नाहीत, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्या ताब्यात घेण्यात येतील, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल, सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँके वरील कारवाई हा राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालकांना एक इशारा आहे. त्यामुळे एका चांगल्या अर्थाने संचालक मंडळाच्या बेलगाम कारभाराला दहशत बसेल, असे पाटील म्हणाले. नियमबाह्य कर्जवाटपामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अशा महत्त्वाच्या संस्था अडचणीत आल्या आहेत. ज्या संस्था अडचणीत आल्या आहेत, त्यांची जबाबदारी संबंधित संचालक मंडळावर निश्चित केली जाईल. जनतेचा पैसा वसूल केला जाईल, असे पाटील म्हणाले.