घरफाळा २५.६४ कोटींचा वसूल
By admin | Published: March 29, 2016 11:32 PM2016-03-29T23:32:56+5:302016-03-30T00:07:57+5:30
इचलकरंजी नगरपालिका : ९० टक्क्यांहून अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट
इचलकरंजी : शहरातील वस्त्रोद्योगात असलेली मंदी आणि ऐन वसुलीच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागलेले निवडणुकीचे काम असे असतानाही दररोज सरासरी तीस लाख रुपयांची घरफाळा वसुली होत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ९० टक्क्यांहून अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या २५ कोटी ६४ लाख ३५ हजार ७४५ रुपयांची घरफाळा वसुली झाली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार व कर वसुली अधिकारी महिपती बाबर यांनी दिली.
शहराचा प्रमुख उद्योग असलेल्या वस्त्रोद्योगामध्ये सातत्याने आर्थिक मंदी आहे. त्याचबरोबर वसुलीचे काम वेगाने सुरू झाले असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानकपणे निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सर्वेक्षणाचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला. त्यातच फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा व मार्चचा पहिला आठवडा या कालावधीत शहरास पाणीटंचाईने सतावले. त्याचाही मोठा परिणाम कर वसुलीवर झाला.
अशा परिस्थितीमध्येसुद्धा घरफाळा व पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी शहरातील प्रत्येक वॉर्डासाठी एक याप्रमाणे २५ वसुली पथके स्थापन करून त्यांना गतिमान करण्यात आले. कर वसुलीसाठी प्रसंगी नळ जोडण्या तोडणे, जप्तीची मोहीम हाती घेणे आणि मालमत्ता सील करणे अशा प्रकारच्या कारवाया करणे भाग पडले, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
धडक मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद
सन २०१५-१६ ची घरफाळा वसुली २९ कोटी ९९ लाख ४५ हजार ८० रुपये होती. त्यापैकी आतापर्यंत २३ कोटी ११ लाख ८४ हजार १८४ रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच मागील वर्षापर्यंतची थकबाकी दहा कोटी ६६ लाख ११ हजार ३८५ होती. त्यातील दोन कोटी ५२ लाख ५१ हजार १६१ रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत २५ कोटी ६४ लाख ३५ हजार ७४५ रुपये वसूल केले आहेत. ही धडक मोहीम अशीच चालू ठेवण्यात येणार असून, ९० टक्क्यांपेक्षा जास्त वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असाही ठाम विश्वास अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी व्यक्त केला.