घरफाळ्याचे पावणे तीन कोटी वसूल
By Admin | Published: November 12, 2016 12:51 AM2016-11-12T00:51:17+5:302016-11-12T00:53:02+5:30
सुविधा केंद्रांवर गर्दी : पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारल्या
कोल्हापूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत घरफाळा, पाणीपट्टी वसुलीकरिता ५०० व १००० रुपयांच्या नोटा भरून घेतल्या. त्यासाठी पाचही नागरी सुविधा केंद्रांत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केवळ एका दिवसात २ कोटी ८६ लाख वसुली झाल्याचे सांगण्यात आले.
५०० व १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यामुळे बुधवार व गुरुवार (दि. ९ व १०) पासून महानगरपालिकेने या नोटा स्वीकारण्याचे नाकारले. घरफाळा, पाणीपट्टी, परवाना शुल्क, दुकानगाळ्यांचे भाडे अशा स्वरूपाची कोणतीही रक्कम महानगरपालिकेने स्वीकारली नाही. त्यामुळे या दोन दिवसांत केवळ आठ ते दहा लाखांची वसुली झाली. याचा दोन दिवसांत मोठा फटका बसला; परंतु गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारचे एक परिपत्रक प्रशासनाला मिळाले. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत घरफाळा, पाणीपट्टीच्या वसुलीकरिता ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, अशा सूचना या परिपत्रकानुसार मिळाल्या.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील महापालिका मुख्य कार्यालय, शिवाजी मार्केट, गांधी मैदान, बागल मार्केट, ताराराणी चौक या पाचही नागरी सुविधा केंद्रांत ही सुविधा उपलब्ध करून दिली. सर्वच सुविधा केंद्रांत दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळनंतर ही गर्दी कमी-कमी होत गेली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल २ कोटी ४६लाख ४३ हजार ३११ रुपयांची वसुली झाल्याचे लेखापरीक्षक संजय सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, ही सुविधा आणखी ७२ तासांनी वाढविल्याची अफवा पसरली होती; परंतु आयुक्त पी. शिवशंकर यांनी राज्य सरकारकडे याबाबत चौकशी केली असता असा कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री बारा वाजता ही सुविधा १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
३० डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवा : आजरेकर
राज्य सरकारने जुन्या नोटा भरून घेण्यास महानगरपालिके ला ३० डिसेंबरपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी शुक्रवारी केली. महानगरपालिका हा सरकारचाच एक भाग आहे. सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना बॅँकेच्या दारात मोठ्या रांगेत उभे राहून नोटा बदलणे आणि पुन्हा त्या महापालिके त कराच्या स्वरूपात भरणे अधिक त्रासाचे होणार आहे. त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी, त्यामुळे नागरिकांचा त्रासही कमी होईल आणि महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढेल, असे आजरेकर यांनी म्हटले आहे.