सवलत योजनेमुळे तीन कोटींचा घरफाळा वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:35 AM2021-02-26T04:35:00+5:302021-02-26T04:35:00+5:30
कोल्हापूर : निवासी व अनिवासी वापरातील मिळकतींना चालू वर्षाच्या कराच्या मागणीसह थकबाकीची संपूर्ण रक्कम भरणा केल्यास फेब्रुवारी व मार्चमध्ये ...
कोल्हापूर : निवासी व अनिवासी वापरातील मिळकतींना चालू वर्षाच्या कराच्या मागणीसह थकबाकीची संपूर्ण रक्कम भरणा केल्यास फेब्रुवारी व मार्चमध्ये थकबाकीवरील दंडव्याजावर सवलत देण्याच्या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून, या सवलतीमुळे तीन कोटी आठ लाख १५ हजार १६५ इतका घरफाळा जमा झाला.
या सवलत योजनेचा लाभ २८६८ मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे. योजनेद्वारे एक कोटी ४० लाख ७६ हजार ३०५ रुपये इतकी दंडाची रक्कम जमा असून, एक कोटी ६१ लाख ६६ हजार १६७ रुपये दंडावरील व्याज माफ करण्यात आलेले आहे.
महापालिकेने एक हजार स्केअर फुटाच्या आतील मिळकतधारकांना दंडच्या व्याजामध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ७० टक्के, दि. १ ते १५ मार्चअखेर दंड व्याजात ६० टक्के व दि. १६ ते दि. ३१ मार्चपर्यंत घरफाळा भरल्यास ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. एक हजार स्केअर फुटावरील मिळकतधारकांना दंडाच्या व्याजामध्ये दि. २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ५० टक्के, दि. १ ते दि. १५ मार्चअखेर दंड व्याजात ४० टक्के व दि. १६ ते ३१ मार्चपर्यंत घरफाळा भरल्यास ३० टक्के सवलत दिली जाणार आहे.
एक हजार चौ. स्क्वे. फुटापर्यंतच्या अनिवासी वापरातील मिळकतींना दि. २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ५० टक्के, दि. १ मार्च ते ३१ मार्चअखेर दंड व्याजात ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. एक हजार चौ. स्क्वे. फुटावरील अनिवासी वापरातील मिळकतींना दि. २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ४० टक्के व दि. ३१ मार्चपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ३० टक्के सवलत दिली जाणार आहे.
-शेवटची संधी : बलकवडे-
निवासी व अनिवासी वापरातील मिळकतींना दंड व्याजावरील माफी ही येथून पुढे दिली जाणार नाही ही शेवटची संधी असलेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.