Kolhapur- भरती १,८०० पदांची; पण नोकरीसाठी १४ जण पात्र, रोजगार मेळाव्यात पात्र उमेदवारांची कमतरता
By इंदुमती सूर्यवंशी | Published: June 16, 2023 03:55 PM2023-06-16T15:55:06+5:302023-06-16T15:55:37+5:30
कौशल्य शिक्षणाचा अभाव असल्याने संधी नाही, मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा
इंदुमती गणेश
कोल्हापूर : एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही, मोठ्या संख्येने तरुणाईमध्ये बेरोजगारी वाढत आहे, असे चित्र असताना दुसरीकडे बड्या कंपन्या, आस्थापना व उद्योजकांना पदवीसोबतच विशेष कौशल्य मिळवलेल्या पात्र उमेदवारांची कमतरता जाणवत आहे. मंगळवारी तपोवन मैदानावर झालेल्या रोजगार मेळाव्यात १,८०० पदे भरण्यात येणार होती, त्यासाठी ७०० हून अधिक उमेदवार आले; पण फक्त १४ जणांची अंतिम निवड झाली. एवढी मोठी विषमता कंपन्यांची अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आहे.
जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य शहरांतील कंपन्या व आस्थापनादेखील आपल्याकडील रिक्त पदांसाठी सहभागी होतात. यातील कंपन्यांचा असा अनुभव आहे की, त्यांना अपेक्षित कौशल्य असलेले उमेदवार मिळत नाहीत. सुरुवातीला प्रशिक्षण घेत कमी पगारावर काम करण्याची तयारी नसते. जे टिकून काम करतात, अनुभव मिळवतात त्यांना बढती व पगार वाढवून मिळतो किंवा अन्य कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळते.
मुंबई-पुण्याचे फॅड
मुला-मुलींमध्ये नोकरीबद्दलच्या अवास्तव कल्पना आहेत. कॉलेजमधून बाहेर पडलो की, पाच आकडी पगाराची मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा असते. आपल्याच शहर- जिल्ह्यात कमी पगाराची नोकरी करायची तयारी नसते. दुसऱ्या शहरांमध्ये पगार जास्त दिसत असला तरी घर सोडून एकट्याने राहणे, रूमचे भाडे, जेवणाचा खर्च, प्रवास खर्च, या सर्व बाबींचा विचार केला, तर दोन्ही पगारांचा हिशेब एकाच ठिकाणी येतो, हे मुलांना कळत नाही.
पदवी पुरेशी नाही
पदवी मिळाली की, आपण नोकरीला पात्र ठरलो, हा भ्रम आहे. कारण त्यासाेबत कोणते ना कोणते कौशल्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे. कंपन्यांना अपेक्षित असलेले प्रशिक्षण घेतले पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचा बायोडेटा एकदम चांगला असतो; पण संवादकौशल्य व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभाव असतो. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीसमोर आपली छाप पडली पाहिजे.
कंपन्या आणि उमेदवारांना आम्ही एकाच व्यासपीठावर आणतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत व्यावसायिक कलाकौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. सुरुवातीला मिळालेली कमी पगाराची नोकरीही संयमाने करून अनुभव घेतला की, पुढे यशाचे मार्ग मिळत जातात. नोकरीऐवजी व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठीही विभागाकडून मार्गदर्शन व साहाय्य केले जाते. -संजय माळी, सहायक आयुक्त, कौशल्यविकास, रोजगार व उद्योग विभाग