Kolhapur: अंबाबाई मूर्ती सर्वेक्षणासाठी पुरातत्वच्या निवृत्त तज्ञांची नियुक्ती, दिवाणी न्यायाधीशांचा आदेश
By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 26, 2024 07:14 PM2024-02-26T19:14:49+5:302024-02-26T19:15:25+5:30
४ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या सध्यस्थितीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे निवृत्त अधिक्षक विलास राघवेंद्र मांगीराज, निवृत्त मॉड्युलर आर.एस. त्र्यंबके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवाणी न्यायाधीश व्ही. डी. भोसले यांनी सोमवारी हा आदेश दिला असून तज्ञांनी पाहणीतील निष्कर्ष, मूर्तीची सध्यस्थिती व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल चार एप्रिल पर्यंत अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असून मूर्तीवर २०१५ साली केलेले रासायनिक संवर्धनाचा लेपही आता गळून पडू लागला आहे. मागीलवर्षी नवरात्रौत्सवापूर्वी मूर्तीच्या कानाजवळील भाग दुखावल्यानंत रात्रीतून त्याचे तातडीने संवर्धन करण्यात आले होते. रासायनिक संवर्धनदेखील आता मूर्तीची झीज थांबवू शकत नाही. अशा परिस्थितीत मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे अन्यथा पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी या मागणीचा दावा श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे २०२२ साली दाखल केला होता.
या दाव्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसोबतच जिल्हा प्रशासन, राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले. तर ॲड. प्रसन्न मालेकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले आहेत. मूर्तीची अवस्था आज नेमकी काय आहे हे ठरवण्यासाठी तज्ञ लोकांना पाहणीसाठी नेमावे अशा आशयाचा अर्ज मुनिश्वर यांनी २१ मार्च २०२३ मध्ये दिला होता.
यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी न्यायाधीश व्ही. डी. भोसले यांनी पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिक्षक विलास मांगीराज व आर एस त्र्यंबके यांना मूर्तीची पाहणी करून तिच्या सध्या परिस्थिती व संभाव्य उपाययोजनांबद्दल न्यायालयाला अहवाल सादर करावा असा आदेश दिला. तसेच या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क पंधरा दिवसात भरावे, वस्तुस्थिती व उपाययोजनांचा अहवाल ४ एप्रिलपर्यंत सादर करावा असे निर्देश दिले. या दाव्यात वादीच्यावतीने ॲड. नरेंद्र गांधी, ओंकार गांधी तर देवस्थान समितीच्यावतीने ॲड. ए. पी. पोवार यांनी काम पाहिले.