कोल्हापुरात गुरुवारपासून भरती, ‘व्हाईट आर्मी’तर्फे अन्नछत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:01 AM2018-12-03T11:01:26+5:302018-12-03T11:06:53+5:30
गोव्यासह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील सैन्यभरती गुरुवारपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू होत आहे. या भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन केल्याची माहिती जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : गोव्यासह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील सैन्यभरती गुरुवारपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू होत आहे. या भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन केल्याची माहिती जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तेरा वर्षांत विविध जिल्ह्यांतील ४.५ लाख तरुणांना या अन्नछत्राचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
रोकडे म्हणाले, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे २००५ ला सैन्यभरतीला मोठ्या प्रमाणात तरुण आले होते. त्यावेळी त्या तरुणांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. भरतीसाठी सामान्य कुटुंबांतील मुले देशसेवेचे मोठे स्वप्न घेऊन भरतीसाठी आलेली असतात.
खाण्यापिण्याची सोय नसल्याने त्यांना बिस्किटे, पाणी पिऊन दिवस काढावे लागले. या तरुणांसाठी ‘व्हाईट आर्मी’ने सैनिक कार्यालयात अन्नछत्राची संकल्पना मांडली. तिला तत्काळ मंजुरी मिळाली. सैन्यभरतीवेळी अन्नछत्राची सुरुवात भारतात पहिल्यांदाच कोल्हापुरातून झाली.
आतापर्यंत सांगली, कवठेमहांकाळ, सोलापूर, फलटण, रत्नागिरी, गोवा अशा सैन्यभरतीच्या ठिकाणी जाऊन मोफत अन्नछत्र उभे करून भावी सैनिकांना आम्ही मानसिक बळ देण्याचे काम केले.
या अन्नछत्राची दखल भारतीय वायुसेनेने घेतली असून गोवा, जळगाव सैन्यभरतीवेळी वायुसेनेलाही मदत करण्यात आली. भारतीय स्थलसेना भरती, भारतीय वायुसेना भरती, १०९ टी ए मराठा भरती, माजी सैनिक हरित सेना भरती, एसआरपीएफ पोलीस भरती अशा अनेक भरतीच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षांत सुमारे साडेचार लाख तरुणांना लाभ झाल्याचे रोकडे यांनी सांगितले.
अन्नछत्र चालविण्याची सर्व जबाबदारी ‘व्हाईट आर्मी’चे जवान स्वत: करतात. या उपक्रमात जवान जेवण बनवितात, शिस्तबद्ध पद्धतीने त्याचे वाटपही केले जाते. सैन्यदलातील मेजर जनरल, जनरल, ब्रिगेडीअर्स, कर्नल, आदी अधिकाºयांनी भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसाही केली आहे.
यासाठी कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती मदत करतात. गुरुवारपासून १६ डिसेंबरपर्यंत गोवा व सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तरुणांची सैन्यभरती शिवाजी विद्यापीठ येथे सुरू होत आहे. तिथे अन्नछत्राची सोय केल्याचे रोकडे यांनी सांगितले. यावेळी सचिन भोसले, प्रशांत शेंडे, शैलेश रावण, विष्णू कुंभार, देवराज सहानी, आदी उपस्थित होते.