‘बालविकास’ची तयारी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थांच्या पोटात गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:05 PM2021-12-09T13:05:55+5:302021-12-09T13:06:25+5:30

सरळसेवेने भरती होणार असल्याचे समजून गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

Recruitment of Vacant Child Development Project Officer in Women and Child Development Department | ‘बालविकास’ची तयारी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थांच्या पोटात गोळा

‘बालविकास’ची तयारी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थांच्या पोटात गोळा

Next

संतोष मिठारी

कोल्हापूर : राज्य शासनाने महिला व बालविकास विभागांतर्गत (गट अ, ब) संवर्गातील पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आणली आहे. नियम सुधारित झाल्यास या विभागातील पदभरतीची परीक्षा राज्यसेवेच्या माध्यमातून घेतली जाईल. त्यामुळे सरळसेवेने भरती होणार असल्याचे समजून गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला आहे. आमची तयारी वाया जाणार असून, करिअरच्या दृष्टीने नुकसान होणार असल्याने राज्यसेवेतून नव्हे, तर पूर्वीप्रमाणे सरळसेवेद्वारे पदभरती करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

महिला व बालविकास विभागातील रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी (गट ब) आणि अन्य समकक्ष असणाऱ्या ४५ पदांची भरती प्रक्रिया सन २०१८ मध्ये सरळसेवेतून झाली. त्यानंतर तीन वर्षे झाली, तरी अद्याप या विभागातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. गट अ आणि ब संवर्गातील पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविण्यात येईल, अशी माहिती या विभागाने शासनाच्या ‘डीजीआयपीआर’च्या ट्विटर हँडलवर गेल्या महिन्यात दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यसेवेतून भरती घेण्यास विरोध का?

- सरळसेवेतून या पदांचा भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत असे दोन टप्पे असतात. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यास थेट नोकरी मिळत असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

- आता राज्यसेवेतून भरती प्रक्रिया राबविल्यास परीक्षेचा अभ्यासक्रम, स्वरूप बदलणार आहे. राज्यसेवेमधून भरती करायची होती, तर या विभागाने सन २०१८ मधील परीक्षा झाल्यानंतर ते जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार आम्ही तयारी केली असती.

- सरळसेवेने भरती होणार असे समजून आम्ही गेल्या तीन वर्षांपासून तयारी करीत आहोत. अचानक राज्यसेवेद्वारे भरती केल्यास अडचणीचे ठरणार असल्याने आम्ही विरोध करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या विभागातील समकक्ष पदे

निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था अथवा रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, अधीक्षक, सांख्यिकी अधिकारी गट ब.

विद्यार्थी काय म्हणतात?

गेल्या तीन वर्षांपासून महिला व बालविकास विभागातील रिक्त पदांच्या भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीच्या आणि परीक्षा होण्याच्या प्रतीक्षेत दीड लाख विद्यार्थी आहेत. सेवा प्रवेश नियम बदलल्यास त्याचा आम्ही तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. ते टाळण्यासाठी शासनाने सरळसेवेतून भरती करावी. -अमर पाटील, शाहूवाडी

जर, या विभागातील रिक्त पदे राज्यसेवेतून भरायची होती, तर २०१८ मध्ये शासनाने ते जाहीर करायला हवे होते. आता अचानक सेवा प्रवेश नियमात बदल करणे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. पूर्वीप्रमाणे सरळसेवेमधून भरती करावी. -अमिता नुले, कोल्हापूर

Web Title: Recruitment of Vacant Child Development Project Officer in Women and Child Development Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.