जिल्ह्यात आज, उद्या ‘रेड अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:38+5:302021-07-21T04:17:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात आज, बुधवार व उद्या दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून जिल्हा प्रशासनाने रेड ...

Red alert in district today, tomorrow | जिल्ह्यात आज, उद्या ‘रेड अलर्ट’

जिल्ह्यात आज, उद्या ‘रेड अलर्ट’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्ह्यात आज, बुधवार व उद्या दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट दिला आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या सहा तालुक्यांत धुवाधार पाऊस कोसळणार असून, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी सकाळपासून तर गगनबावड्यासह शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात संततधार सुरू राहिली. दिवसभर एकसारखा पाऊस सुरू असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. कोल्हापूर शहरात दिवसभर रिपरिप राहिली असून अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर असून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २७ फुटापर्यंत पोहचली असून पंधरा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. खरीप पिकांना पोषक पाऊस सुरु आहे. शिवारात पाणी तुंबल्याने भात पिकांची वाढ चांगली सुरू आहे.

पावसाळा गारठा

मंगळवारी दिवसभर एकसारखा पाऊस राहिला. जोरदार पावसाबरोबरच हवेत कमालीचा गारठा होता. त्यामुळे अंगातून थंडी जात नव्हती.

‘म्हातारा’ची एंट्री जोरदार

मागील नक्षत्र बऱ्यापैकी उघडे गेल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र, सोमवारी पहाटे ४.४३ मिनिटांनी सूर्याने ‘पुष्य’ नक्षत्रात प्रवेश केला आहे. वाहन ‘घोडा’ असून या कालावधीत सर्वत्र जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. या काळात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा’ पाऊस म्हटले जाते. ‘म्हातारा’ने एंट्री जोरदार केली आहे.

भूत्खलन, दरडी कोसळण्याचा धोका

साधारणत: गगनबावड्यासह सहा तालुक्यांत आज दिवसभरात ७० ते १५० मिलिमीटर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. यामुळे डोंगराळ भागात भूत्खलन, दरड कोसळण्याचे प्रकार होऊ शकतात. तरी नागरिकांना सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शुक्रवारी (दि. २३) पावसाचा जोर कमी येणार असला तरीही ऑरेंज अलर्ट दिला आहे.

कळंबा तुडुंब

करवीर तालुक्यातील कळंबा तलाव मंगळवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Web Title: Red alert in district today, tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.