डेंजर झोनमध्ये लाल दिवा
By admin | Published: September 23, 2014 12:20 AM2014-09-23T00:20:43+5:302014-09-23T00:48:46+5:30
गैरवापराबाबत कारवाई : प्रादेशिक परिवहन विभागाची धडक मोहीम
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गाडीवर लाल, अंबर व निळा दिवा वापरून गैरवापर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी आज, सोमवारी पत्रकाद्वारे दिला आहे. गृहविभागाच्या सूचनेची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागातर्फे उघडली जाणार आहे.सर्वाेच्च न्यायालयाने १५ आॅक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या आदेशाने गृहविभागाने ४ एप्रिल २०१४ रोजी काढलेल्या परिपत्रकात कोणत्या अधिकाऱ्याने कोणत्या रंगांचा गाडीवर दिवा वापरावा याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये लाल, अंबर व निळा दिवा गाडीवर लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. अनेक अधिकारी व कर्मचारी या आदेशाचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानेच राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिवा असणाऱ्या सर्वच गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवा असणारी गाडी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांस नियमांनुसार असा दिवा वापरण्यास परवानगी आहे किंवा नाही. यापूर्वी दिवा वापरण्याचा अधिकार होता. शासन आदेशानंतरही अनेक अधिकारी दिवा असणाऱ्या गाडीचा वापर करीत आहेत किंवा नाहीत त्याची शहानिशा केली जाणार आहे. अधिकारी गाडीत नसताना गाडीचा दिवा कापडाने झाकूनच संबंधित चालकाने गाडीतून प्रवास करावयाचा आहे.परवानगी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी असा दिवा वापरणे पूर्वी शासकीय परिवहन सेवा किंवा पोलीस विभागातील मोटर परिवहन विभागामार्फतच रीतसर स्टिकर लावूनच घेण्याचा आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणीदरम्यान अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून दिव्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच दिव्याच्या बेकायदेशीर वापराबाबत शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस संबंधित खात्याकडे केली जाणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात लाल दिवा नाही
जिल्हा परिषद अध्यक्ष पिवळा दिवा, तर जिल्हाधिकारी, आरटीओ, पोलीस, प्रांत व तहसीलदारांना गाडीवर निळा दिवा वापरण्याचा अधिकार आहे. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाच्या व्यक्तीस लाल दिवा तोही स्थिर असावा, असे निर्देश आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त व महापौर यांना दिवा वापरण्याचा अधिकार नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी फक्त मोहिमेवर जाताना दिवा लावण्याचा आहे. कोल्हापुरात सध्या एकही लाल दिव्याची गाडी नाही.
टोल वाचविण्याचा दिव्याचा आधार
अनेक अधिकारी शासकीय किंवा खासगी कामासाठी मुंबई-पुण्यासह राज्यभर फिरत असतात. अशावेळी टोल वाचविण्यासाठी हे अधिकारी खासगी गाडीत चालकाशेजारी काचेतून दिसेल अशाप्रकारे लाल दिवा ठेवतात. नाक्यांवर मोठा अधिकारी असल्याचे भासवून टोलमधून सुटका करून घेताना दिसतात, अशाप्रकारे दिव्याचा आधार घेऊन टोल वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करीत आहेत.