मॅँचेस्टरच्या खाऊगल्लीत कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्याची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:03 PM2019-07-10T14:03:11+5:302019-07-10T14:07:43+5:30
कोल्हापूरचे प्रदीप नाळे आणि बोरिवलीचे देवांग घोईल या दोघांनी मॅँचेस्टरमधील करिमाईल (या भागात सर्व हॉटेल्स आहेत) परिसरामध्ये आपल्या ‘झिया रेस्टॉरंट’मधून अस्सल महाराष्ट्रीय पदार्थांचे वाढप करीत इंग्लंडवाल्यांनाही वेड लावले आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने हे हॉटेलही चर्चेत आले आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : इंग्लंडमधील मॅँचेस्टरमध्ये तुम्ही जर गेलात आणि तुम्हांला ‘कोल्हापूरचा तांबडा-पांढरा’ प्यायची इच्छा झाली किंवा कोथिंबिरीची वडी खायची इच्छा झाली तर काळजी करू नका. कोल्हापूरचे प्रदीप नाळे आणि बोरिवलीचे देवांग घोईल हे दोघेजण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. मॅँचेस्टरमधील करिमाईल (या भागात सर्व हॉटेल्स आहेत) परिसरामध्ये आपल्या ‘झिया रेस्टॉरंट’मधून अस्सल महाराष्ट्रीय पदार्थांचे वाढप करीत या दोघांनी इंग्लंडवाल्यांनाही वेड लावले आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने हे हॉटेलही चर्चेत आले आहे.
कोल्हापूरच्या टेंबे रोडवर राहणारे प्रदीप यांनी आपले कॉमर्सचे शिक्षण घेतानाच येथील एका हॉटेलमध्ये नोकरीला सुरुवात केली; परंतु करिअर करायचे ठरवून त्यांनी पुण्यातून शासकीय महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंगची पदवी संपादन केली. १९९३ नंतर ते नैरोबीला गेले. तेथे सहा वर्षांचा अनुभव घेऊन कोल्हापुरात आले. तीन वर्षे हॉटेल आणि एक कॅँटीन चालविले; पण ते अस्वस्थ होते. काहीतरी नवीन करायचं होतं. वाट सापडत नव्हती. २००३ मध्ये दुबईला गेले. तिथे पाच वर्षे एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून काम केल्यानंतर त्यांची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यांना इंग्लंड खुणावत होते. ७ नोव्हेंबर २००७ रोजी ते इंग्लंडला गेले. दुबईतच त्यांची ओळख बोरिवलीच्या देवांग घोईल याच्याशी झाली. दोघांनाही एकमेकांची कामाची पद्धत पटली आणि त्यांनी मॅँचेस्टरमधील एका ब्रिटिशाचे रेस्टॉरंट चालवायला घेतले. त्या ठिकाणी पाकिस्तानी, बंगाली अनेकजण असे आहेत की, जे आपल्या हॉटेलच्या बोर्डवर ‘इंडियन फूड’ असे लिहून व्यवसाय करतात; परंतु तेथे कुणाच भारतीयाचे हॉटेल नाही.
या दोघांनी चिकाटीने व्यवसाय करीत पाच वर्षांनंतर हे हॉटेलच विकत घेतले. आज अस्सल भारतीय, महाराष्ट्रीय आणि कोल्हापुरी चवीसाठी ‘झिया’प्रसिद्ध आहे. मॅँचेस्टरच्या आसपास राहणारे अनेकजण सातत्याने महाराष्ट्रीय पदार्थ खाण्यासाठी या रेस्टॉरंटवर येतात. इंग्लंडमध्ये बॉम्बे वडे मिळतात; परंतु अस्सल कोल्हापुरी वडा, सोबतीला तळलेल्या मिरच्या, मिसळ हे सगळं ‘झिया’मध्ये मिळतं.
मी सुरुवातीला कोल्हापुरी मसाले वापरून पदार्थ करीत होतो; परंतु सातत्याने असे मसाले आणणे शक्य होत नाही. त्यामुळे आता येथेच त्या पद्धतीचे मसाले तयार करतो. दोनच दिवसांपूर्वी सुनील गावसकर येथे जेवून गेले; तर पुढच्या आठवड्यात अभिनेता अतुल कुलकर्णी येणार आहे. कोल्हापुरात आल्यानंतर अजूनही मी छोट्या गाड्यांवर आणि छोट्या हॉटेल्समध्ये जातो आणि पुन्हा फ्र्रेश होतो.
- प्रदीप नाळे
मॅँचेस्टर