कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 02:20 PM2023-08-07T14:20:52+5:302023-08-07T14:21:17+5:30
दोन स्वातंत्र्यसैनिकांसह खासदार महाडिक यांची उपस्थिती, दोन खासदारांसह आमदारांची पाठ
कोल्हापूर : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाला. रेल्वे स्टेशनवरील कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक, स्वातंत्र्यसैनिक कलगोंडा पाटील, वसंतराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूरसह देशातील ५०८ आणि राज्यातील ४४ स्थानकांत एकाच वेळी ऑनलाइन हा कार्यक्रम झाला.
यावेळी मोदी म्हणाले, देशभरात रेल्वेचा विकास झपाट्याने केला जात आहे. यासाठी सन २०१४ च्या तुलनेत पाचपट निधी दिला आहे. टप्प्याटप्प्याने रेल्वे फक्त विजेवर चालेल, अशी व्यवस्था केली जाईल. सर्वच रेल्वे स्टेशन इकोफ्रेडली असतील. गणेशोत्सव इकोफ्रेंडली करायचा आहे. यंदाही स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवायचा आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वागतपर भाषणात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वेशी भावनिक नाते आहे. रेल्वे आर्थिक विकासाचे माध्यम आहे. यामुळे पंतप्रधान मोदी हे रेल्वे विकासातून राष्ट्र विकास करीत आहेत.
खासदार महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक विक्रम केला आहे. देशातील ५०८ रेल्वे स्टेशनच्या विकासकामांचे एकाच वेळी भूमिपूजन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारत बदलत आहे. यामुळे सन २०२४ ला पुन्हा मोदीच देशाचे पंतप्रधान होतील.
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राहुल चिकोडे, स्टेशन अधीक्षक विजयकुमार, शिवनाथ बियाणी, वीरेंद्र मंडलिक, भगवान काटे, आदी उपस्थित होते.
नवीन रेल्वेसाठी प्रयत्न करणार
खासदार महाडिक म्हणाले, दिल्लीत प्रश्न मांडून रेल्वे स्टेशनला ४३ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. भविष्यात सह्याद्रीसह नवीन गाड्या सुरू होणार आहेत. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या पंचवीस वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. कोल्हापूर ते मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
दोन खासदारांसह आमदारांची पाठ
कार्यक्रमाकडे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह आमदारांनी पाठ फिरवली होती. महत्त्वाच्या अशा रेल्वे स्टेशनवरील विकासकामांच्या प्रारंभप्रसंगीही हे गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.