वीज कंपनीच्या तक्रारी कमी व्हाव्यात
By admin | Published: November 18, 2014 09:29 PM2014-11-18T21:29:27+5:302014-11-18T23:21:24+5:30
प्रलंबित कामे वेळीच मार्गी लावा : आजऱ्यातील वीज कंपनीच्या तक्रार निवारण सभेतील सूर
आजरा : वीज वितरण कंपनी व तालुक्याचा विकास याचा निकटचा संबंध असून, तालुक्याचा विकास व्हावयाचा असेल, तर वीज वितरण कंपनीबाबतच्या सर्वसामान्यांच्या तक्रारी कमी होण्याबरोबरच प्रलंबित कामे वेळीच मार्गी लागण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसकर यांनी केले. यामध्ये उपस्थित मान्यवरांनीही आपला सूर मिसळला.
आजरा तालुक्यातील वीज वितरण कामातील अडी-अडचणी, ग्राहक व शेतकऱ्यांच्या असणाऱ्या तक्रारी या पार्श्वभूमीवर आयोजित तक्रार निवारण सभेमध्ये सभापती केसरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी धामणे येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी गावातील विजेचा प्रश्न मांडला. चिकोत्रा धरणातील पाणीसाठ्याचा प्रश्न असून, येथील ट्रान्स्फॉर्मर नदीपासून लांब असल्याने दुसरा ट्रान्स्फॉर्मर देण्याची गरज आहे. प्रस्ताव देऊनही वीज वितरण कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वीज बिले वेळेवर देण्याबाबत सदस्या अनिता नाईक, कामिनी पाटील यांनी प्रश्न मांडला. नादुरुस्त मीटर्स, वाढीव येणारी वीज बिले याबाबतही उपस्थितांनी प्रश्न केले.
शिवाजी गुरव यांनी राजीव गांधी योजनेंतर्गत येणारे बिल, तांत्रिक बिघाड व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांवर होणारा अन्याय याबाबतचे प्रश्न उपस्थित केले.
कार्यकारी अभियंता डी. एम. पवार म्हणाले, धोरणात्मक निर्णयामुळे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न असून कृषिपंप, नळपाणी पुरवठा, घरगुती वीज जोडण्या २५ मार्चपूर्वी जोडून दिल्या जातील. गणेश देसाई, अनिरुद्ध रेडेकर, बयाजी मिसाळ, सुनील देसाई, शिवाजी देसाई, छाया केसरकर, दीपिका सुतार, लक्ष्मण सावंत यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)