अनुदान देऊन खतांचे दर कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:43+5:302021-04-10T04:22:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रासायनिक खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर विशेष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रासायनिक खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर विशेष अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
केंद्र शासनाने खतांचे दर ठरवण्याचे अधिकार संबंधित कंपन्यांना दिल्याने त्यांची मनमानी वाढली आहे. ‘इफको’सह इतर खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिकांना खतांचा डोस द्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. एकीकडे खतांचे दर वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला खतांच्या काळाबाजारामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात लिकींग ही त्याच्या माथी मारली जाते, अशा अडचणीत शेतकरी अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने खतांवर विशेष अनुदान देऊन दर कमी करावेत, अशी मागणी विजय देवणे यांनी मंत्री भुसे यांच्याकडे केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : खतांचे दर नियंत्रणात आणा, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने कृषिमंत्री दादा भुसे यांना दिले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. (फाेटो-०९०४२०२१-कोल-शिवसेना)