साखर कारखान्यांची वाढीव शेअर्स रक्कम कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:44+5:302021-06-29T04:16:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांनी सभासद भागाच्या दर्शनी मूल्यामध्ये पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांनी सभासद भागाच्या दर्शनी मूल्यामध्ये पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. कारखान्याचे नक्तमू्ल्य उणे झाल्याने वित्तीय संस्था त्यांना कर्जे देत नसल्याने हा खटाटोप असून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली.
एकीकडे उसाच्या एफआरपीचा बेस कमी करून शेतकऱ्यांना आतबट्यात आणले आहे. त्यातच कारखान्यात तयार होणाऱ्या उपपदार्थांचा वाटा शेतकऱ्यांना दिला जात नाही. उसाचा दर कायदेशीररित्या कमी करून उपपदार्थांचे उत्पन्न लपवले जाते. दुसऱ्या बाजूला इथेनॉल, सहवीज प्रकल्प यांतून होणाऱ्या फायद्याचे अर्थशास्त्र सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. अगाेदरच कारखान्यांच्या भागाची रक्कम दहा हजार आहे. त्यातून शेतकऱ्यांना किती फायदा होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्यामध्ये पाच हजारांची वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, हे अन्यायकारक आहे. शेअर्सची रक्कम वाढवून कारखाने फायद्यात येणार आहेत का? शेतकऱ्यांची लूट करण्याचा नवीन मार्ग कारखानदारांनी शोधला असून तो कदापि मान्य करणार नाही. बिनफायद्याची गुंतवणूक शेतकऱ्यांना मान्य नसून त्याचा त्रास दिला तर शेतकरी संघटना सहन करणार नाही. त्यामुळे शासनाने १८ मे २०२१ रोजी शेअर्स रक्कम वाढीबाबत घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक एस. एन. जाधव यांना दिला.
या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. प्रगती जाधव, अशाेक जाधव, राेहन जाधव, राजलक्ष्मी कुलकर्णी, अनिता निकम, प्रतीक कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, बाळ नाईक, डी. के. कोपार्डेकर आदी उपस्थित होते.