कृष्णा नळ योजनेस पुन्हा गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:03 AM2017-08-09T00:03:57+5:302017-08-09T00:03:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाºया कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेस शिरढोण (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यापैकी एका गळतीची दुरुस्ती करण्यात आली असली तरी वारंवार गळती लागणाºया या योजनेच्या सडलेल्या दाबनलिकेची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.
इचलकरंजीस पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून थेट नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यापैकी पंचगंगा नदीतून २० टक्के व कृष्णा नदीतून ८० टक्के पाण्याचा पुरवठा होतो. पंचगंगा नदीवरील जॅकवेलवर असलेली पाणी उपसा यंत्रणा ३५ वर्षांपूर्वीची असून, तिची क्षमता कमी झाली आहे. तर कृष्णा योजना वीस वर्षांपूर्वीची असून, या योजनेतून शहरापर्यंत १९.६ किलोमीटर पाणी आणले जाते. या योजनेसाठी जमिनीखालून नळ घालण्यात आल्यामुळे जमिनीतील क्षार व शेतीला वापरात येणाºया रासायनिक खताची प्रक्रिया नळांवर झाल्यामुळे हे नळ सडले आहेत.
त्यापैकी सहा किलोमीटर लांबीचे नळ यापूर्वी बदलण्यात आले असून, साधारणत: आणखीन सहा किलोमीटर लांबीचे नळ बदलण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांवरील जॅकवेलमध्ये असलेले पाणी उपसा करणारे पंप नव्याने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे १७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव नगराध्यक्षा
अॅड. अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे दाखल केला होता. त्याचा आता पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे शहराला आवश्यक असलेल्या कृष्णा नळ योजनेची दाबनलिका युद्धपातळीवर बदलली जाईल.
गळतीची दुरुस्ती आज
कृष्णेच्या दाबनलिकेवर शिरढोण गावच्या हद्दीतील काटाप्पा मंदिराजवळ मोठी गळती असून, ही गळती दुरुस्ती करावयाची झाल्यास एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
म्हणून आज, बुधवारी गळतीची दुरुस्ती करण्याचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.