ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2016 12:58 AM2016-02-12T00:58:12+5:302016-02-12T00:58:28+5:30

गुडस् अँँड सर्व्हिस टॅक्स चर्चासत्र : एस. जयकुमार यांचे प्रतिपादन; उद्योजक, व्यावसायिकांशी साधला संवाद

Reduction in tax burden on customers | ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार

ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार

Next

कोल्हापूर : ‘जीएसटी’मुळे करांवरील कर लागू होणे थांबणार असून, ग्राहकांवरील छुप्या कराचा बोजा घटण्याची शक्यता आहे. शिवाय कररचनेत सुसूत्रता येण्यासह करचुकवेगिरीला आळा बसण्यास मदत होईल, असे प्रतिपादन चेन्नईतील करतज्ज्ञ अ‍ॅड. एस. जयकुमार यांनी गुरुवारी येथे केले. येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात गुड्स अ‍ॅँड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी)बाबतच्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभागाचे आयुक्त वसा शेषागिरी राव, तर उपायुक्त श्रद्धा जोशी, सहआयुक्त शामधर प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभाग आणि विविध औद्योगिक संघटनांतर्फे हे चर्चासत्र आयोजित केले होते.अ‍ॅड. एस. जयकुमार म्हणाले, सध्या करांवरील कराचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. जीएसटीमुळे वस्तूच्या मूळ किमतीवर कर लावण्यात येणार असल्याने ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार आहे. कॅनडा, आॅस्ट्रेलिया अशा प्रगत देशांतील करप्रणालीचा अभ्यास करून आपल्या देशाने ‘जीएसटी’चे प्रारूप बनविले आहे. यात केंद्र, राज्य आणि आंतरराज्य असे जीएसटीचे प्रारूप आहे. जीएसटी लागू झाल्यास कररचनेत सुसूत्रता येण्यासह करचुकवेगिरीला आळा बसण्यास मदत होईल. शिवाय सर्वांनाच समान कर रचना लागू असणार आहे.वसा शेषागिरी राव म्हणाले, जीएसटीमुळे उद्योजक, व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे. शिवाय काही सूचना असल्यास द्याव्यात. त्या केंद्राकडे पाठविल्या जातील. कार्यक्रमास नितीन वाडीकर, कमलाकांत कुलकर्णी, संजय जोशी, समीर परीख, योगेश कुलकर्णी, प्रदीपभाई कापडिया, चार्टर्ड अकौंटंट गिरीश कुलकर्णी, आदींसह उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी स्वागत केले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र दिवाण यांनी आभार मानले. दरम्यान, सुमारे दीड तास रंगलेल्या या चर्चासत्रात अ‍ॅड. जयकुमार यांनी उद्योजक, व्यावसायिकांशी ‘जीएसटी’तील विविध पैलूंबाबत संवाद साधला. (प्रतिनिधी)

‘एलबीटी’ राहणारच
जीएसटीमध्ये एलबीटी, व्यावसायिक कर यांचा समावेश केलेला नाही. ५० कोटींवरील उलाढालीवर एलबीटी लागणार आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाला तरी, एलबीटी राहणारच असल्याचे अ‍ॅड. एस. जयकुमार यांनी सांगितले.

Web Title: Reduction in tax burden on customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.