सहवीजमधील वीज उत्पादनातही घट
By admin | Published: March 29, 2017 12:36 AM2017-03-29T00:36:39+5:302017-03-29T00:36:39+5:30
जिल्ह्यातील साखर कारखान्यातील चित्र : १०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका, ऊस उत्पादनात घट झाल्याने परिणाम
प्रकाश पाटील -- कोपार्डे --या हंगामात (२०१६/१७) मध्ये ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली. यामुळे जेमतेम चारच महिने साखर कारखान्यांचे गाळप हंगाम चालले. याचा फटका जसा साखर उत्पादनावर झाला, तसा सहवीज प्रकल्प राबविणाऱ्या १४ साखर कारखान्यांच्या वीजनिर्मितीवर झाला असून, तब्बल ३५ कोटी युनिट वीजनिर्मिती कमी झाली असून, १०० कोटी रुपयांचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांनी २०१६/१७ मध्ये गाळप हंगाम यशस्वी पूर्ण केले. या २१ पैकी १४ साखर कारखान्यांकडे स्वत: सहवीज प्रकल्प असून, ऊस खरेदीकर व सहवीज निर्मितीसाठी मिळणारे स्वस्त व सहज इंधन असणाऱ्या उसाचा बगॅस असल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करूनसहवीज प्रकल्प उभारले आहेत. सहवीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही पाणी व कोळशाच्या वापरापासून तयार होणाऱ्या विजेपेक्षा चांगली व प्रदूषणाला आळा घालणारी असल्याने शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून या सहवीज प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याबरोबर सहा रुपये ६५ पैसे प्रतियुनिटप्रमाणे ही वीज खरेदी करण्याची हमी घेतली आहे.
६५ टक्के
‘कुंभी’ कारखान्याकडून वीज निर्यात
या हंगामात कुंभी-कासारी कारखान्याने कमी कालावधीत चांगले ऊस गाळप करताना सहवीज प्रकल्पातूनही चांगली वीज निर्मिती करताना एकूण उत्पादनाच्या ६५ टक्के विजेची निर्यात करताना केवळ ३५ टक्के विजेचा वापर केला आहे.
वीज उत्पादन, विक्रीत वारणा आघाडीवर
यावर्षी सहवीज प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात वारणा साखर कारखाना आघाडीवर असून, १२ कोटी २४ लाख २७ हजार युनिट वीज निर्मिती करीत आठ कोटी ५४ लाख १५ हजार युनिट वीज विक्री केली आहे.
मागील वर्षी वीज उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या दत्त शिरोळच्या वीज निर्मितीमध्ये ४० टक्के घट झाली आहे. मात्र, दत्त दालमिया कारखान्याने नऊ कोटी एक लाख युनिट वीज निर्मिती करून सात कोटी एक लाख युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे.