लोकमत इफेक्ट : अखेर ते दोन अंध विद्यार्थी पोहोचले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:28 PM2020-06-22T17:28:04+5:302020-06-23T11:56:21+5:30
तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच्या नातेवाईकांकडे सोमवारी सुखरुप पोहोचवण्यात आले.
कोल्हापूर : तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच्या नातेवाईकांकडे सोमवारी सुखरुप पोहोचवण्यात आले.
स्वतंत्र वाहन करुन जाण्याची ऐपत नसल्यामुळे गेले तीन महिने संचारबंदीमुळे कोल्हापूरात अडकलेले हिंगोली जिल्ह्यातील कामिनी ज्ञानेश्वर गडवे आणि अतुल विश्वनाथ भगत हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातच अडकले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होते. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.
यासंदर्भात ३१ मे रोजी लोकमतने बातमी दिली होती. ती वाचून आमदार ऋतुराज पाटील यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची तयारी दर्शविली. हे विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत होते त्या विकास हायस्कूलमध्ये विशेष शिक्षक असलेले अजय वणकुद्रे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेउन त्यांच्याशी चर्चा केली आणि जाण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली.
कसबा बावडा येथील चालक युवराज कुंभार यांनी सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या दोन विद्यार्र्थ्याना हिंगोलीत पोहोचवले. दोघांच्याही पालकांना त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आसवे उभी राहिली. लोकमत आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे त्यांनी आभार मानले.
मास्क, सॅनिटायझरसोबत दिली कोल्हापूरची शिदोरी
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांचे मोफत स्वॅब घेउन त्यांना हिंगोलीत पोहोचविण्याची तयारी केली. त्यांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह येताच त्यांना सॅनिटायझर, मास्क, दोघांच्याही घरी पुरतील इतके अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, ते वापरण्याबद्दलचे सूचनापत्रक देउन त्यांना सोमवारी पहाटे हिंगोलीकडे रवाना केले. याशिवाय मिठाई, कोरडा खाउ, नाश्ता, आणि दुपारचे जेवण अशी कोल्हापूरची शिदोरीही दिली.
होम क्वारन्टाईन करण्याच्या सूचना
या दोन विद्यार्थ्यांना विशेष परवानगी काढून होम क्वारन्टाईन करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्यासोबत स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहेत.
लोकमतमुळे कोल्हापूरात अडकलेल्या या दोन अंध विद्यार्थ्यांना मदत करता आली. या कठीण काळात माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणे आवश्यक होते. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यामुळे प्रोत्साहन मिळाले. लोकमतचे विशेष आभार.
ऋतुराज पाटील,
आमदार, कोल्हापूर.
लोकमतमध्ये आलेली बातमी वाचुन या अंध विद्यार्थ्यांना मदत मिळणे गरजेचे वाटले. आमदार ऋतुराज पाटील यांना या मुलांची अवस्था सांगितली, त्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. या विध्यार्थ्यांना हिंगोली येथे गेल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जाऊ नये यासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये
मोफत स्वाब तपासून तसे प्रमाणपत्र सोबत दिले. यामुळे त्यांना तेथे कोणताही त्रास झाला नाही. तीन महिन्यानंतर त्यांना त्यांचे पालक भेटले यातच आम्हाला समाधान आहे.
महादेव नरके,
प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक,
कसबा बावडा, कोल्हापूर