गणेशोत्सवात उमटणार महापुराचे प्रतिबिंब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:04 AM2019-08-28T01:04:36+5:302019-08-28T01:04:39+5:30
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या ‘न भूतो न भविष्यती’ महापुराच्या संकटाची भीषणता, नदीचे अडवलेले ...
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या ‘न भूतो न भविष्यती’ महापुराच्या संकटाची भीषणता, नदीचे अडवलेले पाणी, मानवी हस्तक्षेप, रेड झोनमधील बांधकामे, निसर्गाशी छेडछाड, आपत्ती व्यवस्थापन, कोल्हापूरकरांची माणुसकी या सगळ्या परिस्थितीचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवात दिसणार आहे. शहरातील मंडळांकडून हा उत्सव साधेपणाने करतानाच देखाव्यांच्या माध्यमातून पर्यावरण जागरूकतेचे अंजन घालण्यात येणार आहे.
मुंबई-पुण्यानंतर कोल्हापूरचा गणेशोत्सव पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक गल्ली, पेठांची देखाव्यांची स्वत:ची अशी ख्याती आहे. उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरीचे तांत्रिक देखावे, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, कसबा बावड्यातील सजीव देखावे, लक्ष्मीपुरी म्हणजे विद्युत रोषणाई, काल्पनिक मंदिरे ही खासियत पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळते.
यंदा मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महापुराने थैमान घातल्याने मंडळांचेच काय, कोल्हापूरचेच आर्थिक, सामाजिक गणित विस्कटले. पुराची ही भीषणता प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर आता उत्सवातील देखाव्यांच्या निमित्ताने नागरिकांना अंतर्मुख करण्याची आणि आपल्या चुकांची जाणीव करून देण्याची सामाजिक जबाबदारीही मंडळे पार पाडणार आहेत. अवचितपीर तालीम मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा सादर करण्यात येणार आहे.
तांत्रिक देखावेही महापुरावरच
शाहूपुरी व राजारामपुरी हे परिसर तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील मंडळांकडूनही महापुराची भीषणता, रेड झोनमधील बांधकामे, नद्यांचा अडविलेला प्रवाह, अलमट्टीची आपत्ती या विषयांवर देखावे केले आहेत.
पाण्याचे शाहूकालीन व्यवस्थापन
जुना बुधवार पेठेतील क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ शाहूकालीन आपत्ती व्यवस्थापनाचा देखावा करणार आहे. त्या काळातील कोल्हापूरचा नकाशा, पाण्याचे नियोजन, घरांची रचना यांची माहिती देखाव्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांची घरे बांधणार बाप्पा
डांगे गल्ली तरुण मंडळाकडूनही पूरस्थितीची भीषणता मांडण्यात येणार आहे. श्री गणेशाचीच मूर्ती देखाव्याच्या रूपात मांडली जाणार आहे. यात गणपती बाप्पा पूरग्रस्तांची पडलेली घरे बांधून देत आहेत, असा आशय राहणार आहे.