गुरव यांच्या साहित्यात क्रांतिकारी विचारांचे प्रतिबिंब

By admin | Published: March 18, 2017 12:24 AM2017-03-18T00:24:46+5:302017-03-18T00:24:46+5:30

सुशीलकुमार शिंदे : अनुराधा गुरव यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

Reflections on revolutionary ideas in Gurav's literature | गुरव यांच्या साहित्यात क्रांतिकारी विचारांचे प्रतिबिंब

गुरव यांच्या साहित्यात क्रांतिकारी विचारांचे प्रतिबिंब

Next


कोल्हापूर : साहित्यातून विचारांच्या विविध रंगांची उधळण होत असते. असे रंग जेव्हा समाजातील वाचकमनाशी समरस होतात तेव्हा त्यातून विचारांची जडणघडण होत असते. वास्तवातील अनेक गोष्टींचे प्रतिबिंब साहित्यातून उमटवीत असताना साहित्यिकाला प्रवाहाच्या विरोधात जावे लागते. अशा विरोधी प्रवाहातसुद्धा जे टिकते ते खरे साहित्य असते. अनुराधा गुरव यांच्या साहित्यातही प्रवाहाविरोधी वाहणाऱ्या क्रांतिकारी विचारांचे प्रतिबिंब उमटते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार, प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी संपादित केलेल्या ‘अनुराधा गुरव : व्यक्ती आणि वाङ्मय’ या गौरव ग्रंथाचे तसेच गुरव यांनी लिहिलेल्या सहा ग्रंथांचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक चंद्रकुमार नलगे होते. यावेळी बाबा सावंत, पत्रकार विजय चोरमारे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, साहित्य हे संस्कृती, समाजव्यवस्था, जीवनशैली यांचा आरसा असतो. ते माणसाला घडवीत असते. त्याच्या दृष्टिकोनातील एकांगीपणा काढून व्यापकपणे समाजाकडे पाहण्याची ऊर्जा साहित्यातून मिळते. त्यासाठी साहित्यिकांना नेहमीच्या वाटेपेक्षा प्रवाहाविरोधातील वाट चोखाळावी लागते.क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ती समाजमनात रुजविणारे वेगळ्या धाटणीचे साहित्य परिवर्तनासाठी योगदान देते.
अनुराधा गुरव यांच्याविषयी ते म्हणाले, आम्ही सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात एकत्र शिकत होतो. सोलापुरातील बाळेसारख्या ग्रामीण भागातून कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी पन्नास वर्षांपूर्वी साहित्याची आवड जपते आणि इतके मोठे स्थान मिळवते हे अभिमानास्पद आहे. त्यांची लेखनशैली सहज समजणारी, सोप्या भाषेची असल्याने सर्वसामान्य वाचकालाही तिची भुरळ पडते.
अनुराधा गुरव म्हणाल्या, साहित्यात आज जे स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला, त्याची प्रेरणा घरातून मिळालेल्या प्रोत्साहनातून, शिक्षकांनी केलेल्या कौतुकातून मिळाली. बाळेसारख्या छोट्या गावात निसर्गाच्या सान्निध्यात गेलेले बालपण आणि तारुण्य लेखनासाठी स्फूर्तिप्रद ठरलं. शब्दांच्या सोबतीने माझे पंचाहत्तर वर्षांचे आयुष्य सुकर केले आहे.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे सेवक संघाचे नेते बाबा सावंत, गौरवग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण, ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरव यांच्या साहित्यावर पहिली तुलनात्मक पीएच. डी. पदवी प्राप्त करणारे डॉ. बाळासाहेब कामाण्णा यांचा सत्कार करण्यात आला. भीमराव धुळुबुळु यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विश्वनाथ भोसले यांनी शिंदे यांचा परिचय करून दिला. डॉ. आशिष गुरव यांनी स्वागत केले. प्रा. टी. के. सरगर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)



कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये शुक्रवारी साहित्यिका अनुराधा गुरव यांचा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला. यावेळी बाबा सावंत, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, पत्रकार विजय चोरमारे, लेखक चंद्रकुमार नलगे, प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Reflections on revolutionary ideas in Gurav's literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.