सुधारित कोल्हापूरसाठी - मॅनेज होणार नाही, संवादातून मराठा समाजाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:17 AM2021-06-28T04:17:56+5:302021-06-28T04:17:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यासंंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यासंंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले.
येथील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळावर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि आरक्षणप्रश्नी १६ जून रोजी मूक आंदोलन केले. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी सरकारशी केलेल्या संवादातून कोणत्या मागण्या मान्य झाल्या, पुढील दिशा कोणती राहणार, यासंबंधीची माहिती देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे येथील भवानी मंडपात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार संभाजीराजे बोलत होते.
ते म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण फेटाळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करीत राहिले. पर्यायावर कोणी बोलायला तयार नाही. म्हणून मी समाजाला न भडकवता शांततेचं आवाहन करीत महाराष्ट्रभर दौरा करून पर्याचा विचार केला. आम्ही सूचवलेल्या पर्यायावर सरकार कार्यवाही करीत आहे.
मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर येत सरकारचे लक्ष वेधले. याची दखल देश आणि जगाने घेतली आहे. त्यानंतर पुन्हा मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांसाठी रस्त्यावर आणणे बरोबर वाटत नाही. आता कोरोनाची महामारी आहे. अशा स्थितीमध्ये संयमाने सरकारशी संवाद साधत मागण्या मान्य करून घेण्याची भूमिका घेतली. यातून सारथीचे तातडीने उपकेंद्र येथे सुरू झाले. तारादूतांची नेमणूक करणे, सारथीला निधी देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून सुलभपणे कर्ज मिळवून देणे आदी मागण्यांवर कार्यवाही सुरू झाली आहे. संवादामुळे हे शक्य झाले आहे. छत्रपतींच्या घराण्यातील वारसदार म्हणून आंदोलन करण्याला माझा विरोध नाही. आंदोलन करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आंदोलन मूक करा, ठोक करा पण आताच्या परिस्थितीचा विचार करा. कोरोना महामारीच्या काळात आंदोलनाने काय साध्य होणार आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
यावेळी ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी रिव्ह्यू पिटिशनासंबंधी नकारात्मक निकाल लागला तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास विलंब लागेल. यामुळे पर्यायाचीही समांतर तयारी करावी.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणासाठी राज्याने संभाजीराजे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. कोल्हापूरकरांनीही त्यांच्या पाठिशी राहावे. मराठा समाजाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी सारथी संस्थेेसंबंधी सरकारशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. उद्योजक व्ही. बी. पाटील, कमलाकर जगदाळे, लालासाहेब गायकवाड, राजू जाधव यांनी विविध मागण्यासंबंधी सूचना मांडल्या.
बैठकीस माणिक मंडलिक, संभाजी देवणे, रमेश मोरे, बाबा पार्टे, सुजित चव्हाण, बाळ घाटगे, इंद्रजित सावंत, अजय इंगवले, सुरेश साळोखे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदी संघटनांची पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
ओबीसीतून आरक्षण द्या असे म्हणणार नाही
खासदार संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समजतेचा विचार मांडला. त्यांचा वारसदार म्हणून मी ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार नाही. जेजे वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी माझी भूमिका कायम राहणार आहे. ते कसे द्यायचे ते सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे आहे.
आंदोलन थांबवलेले नाही
मराठा समाजाच्या मागण्यासंबंधी सरकार सकारात्मक आहे. २१ दिवसांची वेळ त्यांनी मागितली आहे. यामुळे आमचे मूक आंदोलन २१ दिवसांपर्यंत होणार नाही. सर्व मागण्या मान्य न झाल्यास मूक आंदोलन सुरूच राहील. पण कोल्हापुरातील मूक आंदोलनानंतर सरकारशी चर्चा करून कोणत्या मागण्या मान्य झाल्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी राज्यभर बैठका घेणार आहे. त्याची सुरूवात कोल्हापुरातून केल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
चर्चेस तयार
मराठा आरक्षणासंबंधी नरेंद्र पाटील व इतर काही नेते वेगळी भूमिका मांडत आहेत. त्यांनाही बरोबर घ्या, त्यांच्याशीही चर्चा करा, असे राजू सावंत यांनी सूचवले. यावर खासदार संभाजीराजे म्हणाले, नरेंद्र पाटील यांना मी नेहमी सन्मानाची वागणूक दिली. मराठा समाजासाठी मी कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. पण चर्चा करताना मी मांडत असलेल्या जाहीर भूमिकेत बदल करणार नसल्याचे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.