महाद्वार चौकातील रांगोळी, आवळे विक्रेत्यांचा जागा सोडण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:46 PM2021-02-12T17:46:34+5:302021-02-12T17:52:14+5:30
Muncipal Corporation Kolhapur- महाद्वार चौक फेरीवाला मुक्त करण्याबाबत तोडगा निघाला असताना दुसऱ्याच दिवशी (शुक्रवारी) येथील २५ मीटर परिसर रिकामा करण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचारी आणि परिसरातील रांगोळी, आवळे विक्रेते यांच्यात जोरदार वादावादी झाली.
कोल्हापूर : महाद्वार चौक फेरीवाला मुक्त करण्याबाबत तोडगा निघाला असताना दुसऱ्याच दिवशी (शुक्रवारी) येथील २५ मीटर परिसर रिकामा करण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचारी आणि परिसरातील रांगोळी, आवळे विक्रेते यांच्यात जोरदार वादावादी झाली.
यावेळी पोलीस प्रशासनाच्या बळावर साहित्य जप्त करत असताना वाद आणखीन चिघळला. विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी अखेर विक्रेत्यांची समजूत काढली. याच ठिकाणी जागा देण्यासाठी सोमवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत बैठक घेऊ, अशी ग्वाही दिल्यानंतर विक्रेत्यांनी व्यवसाय बंद करून साहित्य बाजूला करून घेतल्यानंतर वादावर पडदा पडला. महाद्वार चौक रिकामा झाला.
अंबाबाई मंदिरातील महाद्वार चौकाच्या तिन्ही बाजूचा २५ मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्यावर फेरीवाला कृती समिती आणि महापालिका प्रशासन यांचे गुरुवारी रात्री एकमत झाले होते. फेरीवाले आणि महापालिका यांच्यातील वादावर पडला असे वाटतच असताना शुक्रवारी मात्र, महाद्वार चौकातील २५ मीटर परिसर रिकामा करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक आणि आवळा, आंबा, रांगोळी विक्रेत्यांमध्ये वादावादी सुरू झाली.
यावेळी काही विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या ४० वर्षांपासून येथे व्यवसाय करतो. कारवाई करणारच असाल तर सर्वांवरच करा, अशी मागणी केली. यावेळी विक्रेते आणि पंडित पवार, इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.