प्रेयसीचा लग्नास नकार, इचलकरंजीच्या तरुणाने कोल्हापुरात येवून संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:06 PM2023-03-17T13:06:10+5:302023-03-17T13:16:29+5:30
कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
इचलकरंजी : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विवेक विष्णुदास शर्मा (वय ३०, रा. जानकीनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विवेक हा बुधवारी (दि.१५) कोल्हापूरला जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर सायंकाळी सात वाजता त्याने कीटकनाशक प्राशन केले असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे नातेवाइकांना फोनवरून समजले. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथे त्याला विचारले असता त्याने ज्या मुलीसोबत प्रेम करीत होतो, तिने लग्नास नकार दिल्याने कोल्हापुरातील सासणे ग्राउंड परिसरातील बागेत कीटकनाशक प्राशन केल्याचे सांगितले.
रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्याला इचलकरंजीतील एका खासगी रुग्णालयात हलविले. तेथे उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. याची रुग्णालयाने शिवाजीनगर पोलिसांत वर्दी दिली. पोलिसांनी कोल्हापुरात घटना घडल्याने हा गुन्हा तिकडे वर्ग केला. विवेक याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.