नोकर भरतीने नव्या संचालकांचा श्रीगणेशा
By admin | Published: May 21, 2015 11:15 PM2015-05-21T23:15:17+5:302015-05-22T00:13:39+5:30
जिल्हा बँक : पहिल्याच बैठकीत होणार ठराव; भरतीचा फेरप्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील नोकर भरतीबाबत फेरप्रस्ताव तयार करण्याचा ठराव पहिल्याच बैठकीत होणार आहे. नोकर भरतीच्या प्रस्तावापासूनच नव्या संचालक मंडळाच्या कारभाराचा श्रीगणेशा होणार आहे. एकूण दोनशे कर्मचाऱ्यांच्या भरतीचा फेरप्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील प्रशासकराज बुधवारी संपुष्टात आले असून, संचालक मंडळाचा कारभार आता सुरू झाला आहे. रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकांच्या कालावधित बराच पाठपुरावा झाला होता. प्रशासकांच्याच कालावधित नोकरभरती होईल, अशी शक्यताही वर्तविली जात होती. तसे प्रयत्नही झाले होते. दीड वर्षापूर्वी याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली नाही. आता प्रशासकराज संपुष्टात आल्याने नव्या संचालक मंडळामार्फत यासाठी विशेष प्रयत्न होण्याची चिन्हे दिसत आहेत. संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची उलाढाल गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तुलनेने कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्याच्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. नव्याने काही योजना राबवायच्या असतील, तर अपुऱ्या संख्याबळाचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. नव्या संचालक मंडळामार्फत याबाबतचा पाठपुरावा आता केला जाणार आहे.
अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी निवडीनंतर नोकर भरतीविषयी प्रतिक्रिया दिली होती. बॅँकेतील नोकरभरती अत्यंत पारदर्शीपणाने पार पाडली जाईल, असे आश्वासन देतानाच त्यांनी नोकर भरतीला प्राधान्य देण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या संकेतानुसार आता बॅँकेत कर्मचारी भरतीबाबतच्या फेरप्रस्तावाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
असे आहे बळ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात २१७ शाखा आहेत. एकूण मंजूर असलेल्या पदांची संख्या १४०४ आहे. सध्याची कर्मचारी संख्या १०२८ इतकी आहे. अजून सुमारे पावणेचारशे कर्मचाऱ्यांची गरज बॅँकेला आहे. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात प्रशासक कालावधित २०० कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आता प्रशासकराज संपुष्टात आल्याने नोकरभरतीसाठी फेरप्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आता तयारी सुरू झाली आहे.