घाटगे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी रिघ
By admin | Published: April 15, 2015 12:43 AM2015-04-15T00:43:07+5:302015-04-15T00:43:07+5:30
मोहिते पाटील, महाडिक यांनी घेतली भेट
कोल्हापूर : सार्वजनिक जीवनातील स्वच्छ, पारदर्शी कारभार, निष्कलंक चारित्र्याद्वारे जनसामान्यांचा विश्वास संपादन केलेले कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मंगळवारी दिवसभर नागाळा पार्क येथील ‘कागल हाऊस’वर मान्यवरांची रिघ लागली होती.
विक्रमसिंह घाटगे यांच्या पत्नी सुहासिनीदेवी, सुपुत्र समरजितसिंह, बंधू प्रवीणसिंह यांची भेट घेऊन मान्यवरांनी त्यांचे सांत्वन केले. राज्य साखर संघाचे अध्यक्ष व खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्याताई कुपेकर, आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, अंबरीश घाटगे, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडे, रामराजे कुपेकर, जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष विलास गाताडे, आदींचा समावेश होता.
विजयसिंह मोहिते-पाटील यांचा घाटगे यांच्याशी खूप जुना स्नेह होता. या दोघांशिवाय अभयसिंहराजे भोसले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे १९८० ते ८५ च्या काळात विधानसभेत होते. काँग्रेसमधील तरुणतुर्क अशी त्यांची ओळख होती. त्याशिवाय साखर कारखानदारीमुळे त्यांच्यातील मैत्रीची घट्ट वीण होती.