यळगूडच्या शेतकरी संस्थेत सत्तांतर
By admin | Published: June 20, 2016 01:04 AM2016-06-20T01:04:22+5:302016-06-20T01:04:22+5:30
सत्ताधाऱ्यांचे खाते रिकामे : गोठखिंडे, मोहिते गटाची बाजी
हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील शेतकरी सहकारी विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थापक अण्णासाहेब गोठखिंडे व शेतकरी सहकारी संघाचे माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले. सत्ताधारी अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
जवाहर साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब गोठखिंडे यांनी २३ जून १९९९ ला संस्थेची स्थापना केली असून ३८९ सभासद मतदानास पात्र आहेत. रविवारी झालेल्या निवडणुकीत ९८टक्के मतदान झाले. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मोहिते व गोठखिंडे गटामध्ये ग्रामपंचायत सत्तेच्या कारणावरून वितुष्ट आल्यामुळे मोहिते गटाने त्यावेळी विरोधक असणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांना पाठिंबा देऊन सत्तांतर घडवून आणले होते. यावेळी मात्र मोहिते यांनी गोठखिंडे यांना सोबत घेत सत्ता परत मिळवून दिली आहे. मोहिते गट किंगमेकर ठरला आहे.
पाटील गटाच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी : विद्यमान चेअरमन अरुण घुणके (१३६), मारुती कदम (१२९), कुबेर डंके (१२७), रामगोंडा पाटील (१२८), शांतीनाथ पाटील (१२५), अरुण पांगरे (१२८), कृष्णात वाडकर (१२६), शहाजीराव शिंदे (१११). महिला गट - राजश्री काटकर (१३५), जयश्री चौगुले (१३२), तानाजी वड्ड (१३७), सुधीर कुर्ले (१२८), विलास चौधरी (१३२).
गोठखिंडे व मोहिते गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी
सर्वसाधारण गट - संस्थापक अण्णासाहेब गोठखिंडे (२०८), सुभाष गोठखिंडे (१९४), शामराव घुणके (१९५), बाळगोंडा पाटील (१९४), बापू माळी (१९८), जनार्दन लोले (१९६), भिकाजी शिंदे (१८९), राजाराम सलगर (१८७). महिला गट - शांताबाई आमत्ते (१९८), कस्तुरी हणबर (१९७), भटक्या विमुक्त जाती जमाती - सदाशिव वड्ड (२०२). इतर मागास वर्ग - आनंदा माळी (२११), मागासवर्गीय-यशवंत कांबळे (२०७).