Kolhapur Politics: ‘के. पी.’ यांच्या शिष्टमंडळाने घेतली सतेज पाटील यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 03:06 PM2024-08-24T15:06:43+5:302024-08-24T15:08:45+5:30
विधानसभा उमेदवारीबाबत केली चर्चा : जागा कोणाला? हाच खरा गुंता
कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या समर्थक शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार सतेज पाटील यांची काँग्रेस कमिटीत भेट घेतली. विधानसभा उमेदवारीबाबत त्यांनी चर्चा केली. पण, ही जागा महाविकास आघाडीमध्ये नेमकी कोणाला जाईल, त्याचा गुंता जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अडचणी असल्याचे सांगण्यात आले.
के. पी. पाटील हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. मात्र, महायुतीमध्ये ही जागा शिंदे सेनेला जाणार असल्याने त्यांची कोंडी होणार हे ओळखून त्यांनी ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीपासून त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी जवळीक वाढवली आहे. लोकसभा निवडणुकीत ते शरीराने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात असले तरी ते मनाने आघाडीसोबत राहिले.
त्यानंतर मात्र, त्यांनी महायुतीच्या जाहीर कार्यक्रमापासून अलिप्त राहणेच पसंत केले.
गेल्या तीन-चार दिवसांत राजकीय घडामोडी वेगावल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर के. पी. पाटील यांच्या शिष्टमंडळाने सतेज पाटील यांची काँग्रेस कमिटीत भेट घेतली. उमेदवारीबाबत लवकर निर्णय घ्या, असा आग्रह होता. पण, जागा वाटप अद्याप झालेले नाही, ‘राधानगरी’च्या जागेवर काँग्रेसने अद्याप दावा सोडलेले नाही. यामध्ये ज्येष्ठ शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
शिष्टमंडळात जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधूआप्पा देसाई, ‘बिद्री’चे संचालक राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, राजू भाटले, भिकाजी एकल आदी सहभागी होते.
‘ए. वाय.’ यांच्या राजीनाम्याने घालमेल
जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ‘राम कृष्ण हरी वाजवा तुतारी’ असे स्टेटस लावल्याने ‘के. पी.’ यांच्या समर्थकांमध्ये घालमेल वाढली आहे. आघाडीची उमेदवारी ‘ए. वाय.’ यांना मिळाली तर अपक्ष राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हेही त्यांना माहिती आहे.