वेळ पडल्यास प्रादेशिक आराखडा रद्द करणार

By admin | Published: March 28, 2017 12:27 AM2017-03-28T00:27:17+5:302017-03-28T00:27:17+5:30

चंद्रकांतदादा पाटील : ६००० हरकती, लोकांमध्ये भीती

Regional Plan cancellation if time comes | वेळ पडल्यास प्रादेशिक आराखडा रद्द करणार

वेळ पडल्यास प्रादेशिक आराखडा रद्द करणार

Next



कोल्हापूर : जिल्ह्याच्या प्रादेशिक आराखड्यावर ६००० हरकती आल्या असून लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. वेळ पडल्यास हा आराखडाच रद्द करून पुन्हा नव्याने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तीन वर्षांत मेहनत घेऊन प्रादेशिक आराखडा तयार केल्याचे सांगितले. यावर एकवेळ मेहनत वाया गेली तरी चालेल, पण लोकांची वाट लागता कामा नये, असे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार केला असून एका रस्त्यावर येणाऱ्या १५ विहिरी गायब केल्या आहेत, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी हा आराखडा ३१ मार्चपूर्वी शासनाला मंजुरीसाठी पाठवायचा असल्याने त्यावर पालकमंत्र्यांची स्वाक्षरी महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यामुळे हा आराखडा मंजुरीसाठी जाऊ दे नाही तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटल्यावर तीन वर्षे जातील. आराखडा मंजूर झाल्यावर त्यावर चौकशी लावून ती वर्षभरात पूर्ण करून त्रुटी दूर करता येऊ शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, आराखडा मंजुरीसाठी पाठविल्यानंतर तो मंजूर झाल्यावरही त्यावर चौकशी लावता येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगून आपण यावर चौकशी लावू. हा आराखडा लोकांच्या हितासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशी समिती नेमून लोकांच्या शंकांचे समाधान होईपर्यंत हा आराखडा मंजूर करू देणार नाही. वेळ पडल्यास हा आराखडा रद्द करून पुन्हा नव्याने सुरुवात केली जाईल;
परंतु लोकांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. (प्रतिनिधी)
तोपर्यंत अधिकारीच सरकार चालविणार
लोकप्रतिनिधींकडून एखाद्या विषयात लक्ष घालून बारकाईने अभ्यास करून ते हुशार होत नाहीत तोपर्यंत अधिकारी व प्रशासनच सरकार चालवतील, असे सांगून हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्र्यांनी मांडले.

Web Title: Regional Plan cancellation if time comes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.