'शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियमबाह्य निवड; पुन्हा प्रक्रिया राबवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 12:10 PM2024-10-01T12:10:27+5:302024-10-01T12:10:45+5:30

पतित पावन संघटनेची मागणी : १४ ऑक्टोबरनंतर केबिनमध्ये बसू देणार नाही

Registrar of Shivaji University Illegal election of Dr. V. N. Shinde | 'शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियमबाह्य निवड; पुन्हा प्रक्रिया राबवा'

'शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियमबाह्य निवड; पुन्हा प्रक्रिया राबवा'

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची नियमबाह्य निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, इतर पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याने या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, त्रयस्थ विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीतर्फे फेरनिवड प्रक्रिया राबवावी अन्यथा संघटनेतर्फ दि. १४ ऑक्टोबरला कुलगुरुंसमोर आंदोलन करण्यात येईल तसेच कुलसचिवांना केबिनमध्ये बसू देणार नाही, असा इशारा पतित पावन संघटनेचे सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

याबाबत बाजू समजून घेण्यासाठी कुलसचिव डॉ. शिंदे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला. त्यावर ते म्हणाले, यासंबंधीचे कोणतेच निवेदन मला मिळालेले नाही. त्यामुळे यातील कोणत्याही आरोपाबाबत मी भाष्य करणार नाही. ते निवेदन प्रशासनास पाठवले असेल तर प्रशासनच त्याचे उत्तर देईल. माध्यमांनीही या आरोपांना फार महत्त्व देऊ नये.

संपर्कप्रमुख संजीव सलगर, मधुकर मांडवकर, काकाजी मोहिते, अतुल कोईगडे, विनोद बामणकर, विठ्ठल आडूळकर, राजेंद्र पाटील, मेघश्याम जगताप आदींनी यासंबंधीच्या तक्रारी पत्रकार परिषदेत लेखी निवेदनाद्वारे केल्या. त्या अशा : कुलसचिवपदाच्या मुलाखती दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडल्या, त्यात डॉ. व्ही. एन. शिंदे यांची नेमणूक झाली, याबाबत संघटनेने काही आक्षेपार्ह बाबी राज्यपाल तसेच कुलगुरुंना निवेदन पाठवून उघडकीस आणल्या आहेत. शिक्षक संवर्गातून आले नसतानाही डॉ. शिंदे यांनी सहसंचालक कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीर पीएचडीच्या आर्थिक लाभ लागू करून फसवणूक केली. डॉ. शिंदे यांच्या सेवापुस्तकात व्हाइटनर लावून खाडाखोड केली आहे. 

शिंदे यांच्यावर २०१० ते २०१५ या कालावधीतील शिक्षक व शिक्षकेतर भरतीत अनियमितता केल्याचा ठपका २०१६ मध्ये तत्कालीन शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे यांच्या समितीने ठेवला आहे. दीड वर्षापूर्वीच्या कुलसचिव निवडप्रक्रियेत समितीने शिंदे यांच्यासह सर्व उमेदवार अपात्र ठरवले, मग या प्रक्रियेत ते पात्र कसे ठरले, न्यू कॉलेजचे प्राचार्य म्हणून व्ही. एम. पाटील यांची निवड बेकायदेशीर असताना ते कुलसचिव पदाच्या मुलाखतीच्या निवड समितीचे सदस्य कसे ठरले? असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे.

Web Title: Registrar of Shivaji University Illegal election of Dr. V. N. Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.