गेल्या चार वर्षांत २० हजार उद्योगांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:25 AM2018-03-12T00:25:11+5:302018-03-12T00:25:11+5:30
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘फौंड्री हब’ अशी आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत २० हजार ८१९ उद्योगांची नोंदणी झाली आहे. त्यातून साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख ३५ हजार ४५ जणांना रोजगार उपलब्ध झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्रातील आकडेवारीवरून दिसते.
सप्टेंबर २०१५ पर्यंत उद्योगांची नोंदणी अथवा ते सुरू करताना पहिल्यांदा जिल्हा उद्योग केंद्राकडे
अर्ज करावा लागत होता. त्यानंतर उद्योग निरीक्षकांनी पाहणी
केल्यानंतर संबंधितांना नोंदणीसह तो सुरू करण्याची परवानगी दिली जात होती. मात्र, आॅक्टोबर २०१५ पासून या प्रक्रियेत बदल केला आहे.
केंद्र सरकारच्या ‘उद्योग आधार’ या पोर्टलवर आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर नोंदणी मिळत आहे. नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली. ‘उद्योग आधार’ सुरू होण्यापूर्वी सन २०१४-१५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात २ हजार ८२७ उद्योगांनी ८७२ कोटींची गुंतवणूक करून १८ हजार ६९७ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. ‘उद्योग आधार’च्या पहिल्या वर्षात उद्योगांची नोंदणी ३६५२ इतकी झाली. त्यानंतरच्या दुसºया वर्षी ८२९० आणि गेल्यावर्षी ६०५० इतक्या उद्योगांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक उद्योग हे सूक्ष्म गटातील आहेत. त्यापाठोपाठ लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये आहे. नोंदणीकृत उद्योग, त्यांच्याकडून झालेली गुंतवणूक आणि उपलब्ध रोजगारांची संख्या पाहता उद्योगक्षेत्र वाढीचे चित्र आहे.
पडताळणीची प्रक्रिया बंद
‘उद्योग आधार’ सुरू झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया वेगवान झाली आहे. मात्र, नोंदणीकृत झालेले उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत का? त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे नेमके किती उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत; त्यांनी किती गुंतवणूक केली असून किती रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही.
आकडा यामुळे दिसतो मोठा
बहुतांश उद्योजक हे स्वमालकीच्या जागेमध्ये उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीतील ५० टक्के हिस्सा हा जागा खरेदीवर खर्च होत आहे. तसेच आणखी दहा टक्के हिस्सा हा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी खर्च होतो. त्यामुळे आकडा मोठा दिसत आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
वर्षे उद्योगांची रोजगार उपलब्धता गुंतवणूक
नोंदणी (हजारांत) (कोटींमध्ये)
२०१४-१५ २८२७ १८६९७ ८७२
२०१५-१६ ३६५२ ३२३०० ११४४
२०१६-१७ ८२९० ४५००० ३८१५
२०१७-१८ ६०५० ३९०४८ १६००